पुणे, डिसेंबर : अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषदेच्या वतीने स्वर्णिम विजय दिनानिमित्त (१६ डिसेंबर) भारतीय सेनेच्या विजयगाथेवर आधारित छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती परिषदेचे प्रभारी योगेश गोगावले आणि महासचिव वीरेंद्र महाजनी यांनी पत्रकाद्वारे कळविली आहे.
बांगलादेश निर्मितीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त म्हात्रे पूलाजवळील डी. पी. रस्त्यावरील सिद्धी गार्डन येथे १६ डिसेंबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळेत प्रदर्शन होणार आहे. ते सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे. प्रदर्शनापूर्वी सकाळी साडेनऊ वाजता ताथवडे उद्यानातील हुतात्मा प्रदीप ताथवडे यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून पथ संचलनाला प्रारंभ होणार आहे.
कारगील युद्धात अतुलनीय पराक्रम आणि जबरदस्त शौर्यामुळे महावीर चक्र मिळवलेले भारतीय पायदळाचे कमांडो नायक दिगेंद्र कुमार उर्फ कोब्रा कमांडो विजय मशाल घेऊन संचलनात सहभागी होणार असून, ते या संपूर्ण कार्यक्रमाचे नेतृत्व करणार आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमळकर, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
सकाळी दहा वाजता सिद्धी गार्डन येथे विजय स्तंभाला मानवंदना देऊन प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (डीआरडीओ) महासंचालक (एसीई) प्रवीणकुमार मेहता, एआरडीईचे संचालक डॉ. व्ही. व्यंकटेश्वर राव, आरएनडी इंजिनिअरचे संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
बॅटल ऑफ हिली (ईस्ट पाकिस्तान), बांगलादेशी निर्वासित, बॅटल ऑफ लोंगोवाल, आयटेशन तंगाली (पॅराशूट ड्रॉप), बॅटल ऑफ शकरगड, पाकिस्तान सैन्याची शरणागती, शरणागतीवर स्वाक्षरी, परमवीर चक्र विजेत्यांची माहिती आदी शंभरहून अधिक छायाचित्रे प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत.
डीआरडीओ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, डी. वाय. पाटील विद्यापीठ आणि रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी या प्रदर्शनाच्या संयोजनात सहभागी होणार आहेत.
स्वर्णिम विजय दिनानिमित्त छायाचित्र प्रदर्शन
Date:

