पुणे- पेट्रोल – डीझेल चे भाव वाढले कि वाहतूकदर वाढते आणि सर्वच चीज वस्तूंचे भाव हि वाढतात , कोरोना ने अनेकांना बेरोजगार केले असताना , अनेकांचे पगार कमी केले असताना विशेष म्हणजे कारवर कर लावून पेट्रोल डिझेलची महागाई होताना सामन्य माणूस या महागाईत होरपळून निघतो आहे. पण याची चिंता ना केंद्र सरकारला , ना राज्य सरकारला .. ना कुणाला अशा स्थितीतच आज पुण्यात सोमवारी (दि.15) पेट्रोलच्या भावाने प्रतिलिटर 95 रुपयांचा टप्पा पार केला आहे. तर डिझेलचे भाव 85 रुपयांच्या घरात पोहोचले आहेत. शहरामध्ये सलग सातव्या दिवशी इंधनाच्या दरात वाढ झाली आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीने आज पूर्वीचा उच्चांक मोडला आहे. शहरामध्ये 20 नोव्हेंबर 2020 पासून इंधनाच्या दरात सातत्याने वाढ होत असून अद्यापही दरवाढ होतच आहे. यामुळे नागरिकांचे आर्थिक बजेट ढासळले आहे.
इंधनाच्या दरात दररोज काही पैशांची वाढ होत आहे. मंगळवारी (दि.9) पेट्रोलचा दर 93.48 आणि डिझेलचा दर82.74 रुपये प्रतिलिटर होता. या सात दिवसांमध्ये पेट्रोल 1.62 तर डिझेल 1.94 रुपयांनी महागले. 2013 साली आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑइलची किंमत 140 रुपये प्रति डॉलर झाली होती. त्यामुळे 2013 मध्ये पेट्रोलचा दर 93 रुपयांवर पोहचला होता. मात्र आता हा उच्चांक मोडीत निघाला असून आज पुण्यात पेट्रोलचे दर 95 रुपयांच्या वर पोहचले आहेत. तर यापूर्वी डिझेलचा उच्चांक 78 रुपये प्रतिलिटर होता. आज डिझेलचा दर 85 रुपयांच्या घरात पोहचला आहे.
3 महिन्यात पेट्रोल 7.5 रुपये तर डिझेल 9 रुपयांनी महागले
मागील तीन महिन्यांमध्ये पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 7.43 आणि डिझेलच्या दरात 8.97 रुपयांनी वाढ झाली आहे. शहरामध्ये 20 नोव्हेंबर 2020 रोजी पेट्रोलचा दर 87.67 रुपये प्रतिलिटर इतका होता तर डिझेलचा भाव 75.71 रुपये प्रतिलिटर होता. आज (सोमवार) पेट्रोलचा दर 95.10 आणि डिझेल 84.68 रुपये प्रतिलिटर झाले आहे.
पेट्रोल 20 नोव्हेंबर ते 19 डिसेंबर 2020 या कालावधीत 90 रुपये प्रतिलिटर होते. तर 19 जानेवारी 2021 रोजी पेट्रोलचा दर 94.47 रुपये होता. आज (15 फेब्रुवारी) पेट्रोलचा दर 95.10 रुपयांपर्यंत पोहचला आहे.
डिझेल 20 नोव्हेंबर ते 19 डिसेंबर 2020 या कालावधीत 78.97 रुपये प्रतिलिटर होते. तर 19 जानेवारी 2021 रोजी डिझेलचा भाव 80.58 रुपये होता तर आज (15 फेब्रुवारी) डिझेलचा दर 84.68 रुपयांपर्यंत पोहचला आहे.

