पुुणे : आपल्या देशात इंडिया विरुद्ध भारत ही परिस्थिती वाढते आहे आणि हे आपल्यासमोरचे सर्वांत मोठे आव्हान आहे. शिक्षणातून ही परिस्थिती दूर करता येणं शक्य आहे परंतु, त्यासाठी सर्व शैक्षणिक संस्थांनी एकत्रित प्रयत्न केले पाहिजेत, असे प्रतिपादन मराठवाडा मित्र मंडळ संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष प्राचार्य भाऊसाहेब जाधव यांनी आज येथे केले.
डीपर, सर फाउंडेशन व साद माणुसकीची या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्थांच्या वतीने प्राचार्य भाऊसाहेब जाधव यांना संस्थापालक सन्मानाने गौरवण्यात आले. सकाळ माध्यम समुहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला. या पुरस्काराचे स्वरुप 51 हजार रुपये, शाल, श्रीफळ, सन्मानपत्र असे आहे. याप्रसंगी ग्राहक पेठचे कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक, कार्यक्रमाचे आयोजक व संस्थापक हरिश बुटले, सौ. जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. प्राचार्य भाऊसाहेब जाधव यांनी एक लाख रुपये सामाजिक कार्यासाठी डीपर, सर फाउंडेशन व साद माणुसकीची या संस्थेला देण्याची घोषणा यावेळी केली.
परिस्थिती नेहमीच सकारात्मक असत नाही. त्यामुळे त्याची कारणं देत बसणं योग्य नाही. कुठल्याही परिस्थितीत संस्थेचे अहित होणार नाही याची काळजी संस्थेच्या पालकांने घेतली पाहिजे. संस्था पालक या सन्मानाने संस्थेच्या पालकत्वाची जाणीव अधिक तीव्रतेने करून देण्याचं काम केले आहे. सध्याची परिस्थिती खूप विदारक चित्र समोर आणते आहे. ते म्हणजे आर्थिक विषमता होय. त्यामुळे इंडिया विरुद्ध भारत ही परिस्थिती वाढते आहे. आणि यापुढील काळात आपल्याला यावरच काम करावे लागेल. अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाईल, असेही प्राचार्य भाऊसाहेब जाधव यांनी सांगितले.
कर्मवीर भाऊराव पाटील, महर्षी कर्वे यांच्यासारख्या संस्था पालकांमुळेच महाराष्ट्राच्या कित्येक पिढ्या घडल्या व घडताहेत. पुणे हे संस्थांचे शहर आहे. एकेका विषयावर अनेक संस्था येथे काम करतात. भाऊसाहेब जाधव यांनी मराठवाडा मित्र मंडळ संस्थेचे बीज अतिशय उत्तमरितीने जोपासले व वाढवले. हरीश बुटले यांनी अतिशय योग्य व्यक्तीची निवड संस्था पालक सन्मानासाठी केली, असे प्रतापराव पवार म्हणाले.
समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी डीपर, सर फाउंडेशन व साद माणुसकीची या संस्था कार्यरत आहेत. विद्येचे दान केले जाते. मात्र, अलिकडच्या काळात विद्याचा व्यवसाय काही मंडळींनी केला. अशा परिस्थितीत प्राचार्य भाऊसाहेब जाधव यांना संस्था पालक सन्मान देऊन हरीश बुटले यांनी विद्येचं महत्व वाढविण्याचा प्रयत्न केला, असे सूर्यकांत पाठक यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले.
शिक्षण क्षेत्रातील कार्यानंतर ग्रामसुधार व ग्राम विकास या विषयावर सुरु असलेले उपक्रम आणि बारावीनंतरच्या इंजिनियरींग व मेडिकल प्रवेशासाठी च्या परीक्षेसाठी घेण्यात येत असलेल्या सराव परीक्षेबद्दल संस्थेचे संस्थापक हरीश बुटले यांनी यावेळी माहिती दिली.
दरम्यान, विळखा पाणी प्रश्नाचा या विषयावर आज सकाळी महाचर्चा झाली. यामध्ये शिरपूर पॅटर्नचे सुरेश खानापूरकर, जलयुक्त शिवारचे चंद्रकांत दळवी, जनकल्याण समितीचे अनिल मोहिते, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता हेमंत धुमाळ, जलबिरादरीचे सुनील जोशी, पाणी फाउंडेशनचे नामदेव ननावरे, आर्ट ऑफ लिव्हिंगचे डॉ. संदीप शिरखेडकर, जलसंवादचे संपादक डॉ. दत्ता देशकर, निवृत्त सचिव दि. मा. मोरे, ज्येष्ठ पत्रकार डॉ. सुधीर भोंगळे, पर्यावरण तज्ज्ञ उदय गायकवाड, सहज जलबोधकार उपेंद्र धोंडे आणि मानवलोकचे अनिकेत लोहिया सहभागी झाले होते.
लोकसहभागातून महाराष्ट्राचा दुष्काळ नाहीसा करणं आणि महाराष्ट्राला पाणीदार करणे शक्य आहे. त्यासाठी सरकारी योजना अभ्यासपूर्वक राबवताना त्या तांत्रिकदृष्ट्या सक्षम राबविल्या पाहिजेत. 6 टक्के जमिनीसाठी 56 टक्के पाणी तर, 94 टक्के जमिनीसाठी 44 टक्के पाणी असा विरोधाभास महाराष्ट्रात आहे, अशी मतं मान्यवरांनी मांडली.
याबरोबरच डीपरच्या वतीने 12 वी नंतरच्या इंजिनियरींग व मेडिकल प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या सराव परीक्षेत प्रथम आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. तसेच, स्वर्गीय प्रा. अनिल देशमुख पहिला स्मृती सन्मान डीपर आणि कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघ मुंबई येथील शिक्षक कार्यकर्ते व ए. व्ही. पटेल कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. मयुर मेहता यांना यावेळी प्रदान करण्यात आला. सहसंवाद : कृतार्थ सहजीवनाचा हा सामाजिक कार्यकर्ते दत्ताभाऊ बारगजे व संध्या बारगजे यांचा कार्यक्रम झाला.

