पुणे : खेळामुळं माणूस तंदुरुस्त राहतो. पर्यायानं देश तंदुरुस्त राहतो. परंतु, आपला देश खेळामध्ये मागे आहे. खेळात प्रगती करण्यासाठी सर्व शाळांमध्ये खेळ बंधनकारक केला पाहिजे, असे मत राज्यसभा खासदार संजय काकडे यांनी आज व्यक्त केले.
पुणे महापालिकेने आयोजित केलेल्या आंतरशालीय क्रीडा स्पर्धेचा समारोप आणि खेलो इंडिया मध्ये राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंचा सत्कार खासदार संजय काकडे यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. श्रीमती सावित्रीबाई गणपत पवार फाउंडेशनच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास नगरसेवक शंकर पवार, क्रीडा अधिकारी राजेंद्र ढुमने, शाळेच्या मुख्याध्यापिका गिरीजा तरवडे, शाळा सुधार समितीच्या उपाध्यक्षा विनया बहुलीकर, सामाजिक कार्यकर्ते तुकाराम पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
खेळामुळे आपण मानसिकदृष्ट्याही तंदुरुस्त राहतो. खेळातूनच उद्याचे नेतृत्व घडणार असल्याने खेळाकडे लक्ष द्यायला हवे. त्यादृष्टीकोनातून नियोजन व्हायला पाहिजे. यासंदर्भात आपण महापालिकेला लवकर पत्र पाठवणार आहोत, असेही खासदार काकडे म्हणाले.