आंरराष्ट्रीय स्तरावरील सुवर्ण पदकांचा दुष्काळ संपविण्यासाठी पैलवान फाउंडेशनची मोहिम
राहुल आवारे, विजय चौधरी व अभिजीत कटके यांचा विशेष सत्कार
हनुमंतराव गायकवाड ‘महाराष्ट्र संघर्ष’ व रणजीत पाटील ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मानित
पुणे-महाराष्ट्रातील गुणवत्ता असलेल्या 100 पैलवान मुलांना दत्तक घेण्याची घोषणा पुण्यातील पैलवान फाउंडेशनने केली आहे. पैलवान फाउंडेशनच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात फाउंडेशनचे संस्थापक ज्ञानेश्वर मांगडे यांनी ही घोषणा केली.
पैलवान फाउंडेशनच्या प्रथम वर्धापन दिनाचा कार्यक्रम अण्णाभाऊ साठे सभागृहात झाला. सद्गुरु नारायण महाराज यांच्या हस्ते राष्ट्रकूल स्पर्धेतील सुवर्ण पदक विजेता राहुल आवारे, तीनवेळा महाराष्ट्र केसरी झालेले विजय चौधरी, नुकताच महाराष्ट्र केसरी झालेला अभिजीत कटके यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच, कै. पै. बबनराव डावरे यांच्या स्मरणार्थ बीव्हीजी ग्रुपचे अध्यक्ष व प्रसिद्ध उद्योजक हनुमंतराव गायकवाड यांना ‘महाराष्ट्र संघर्ष’ पुरस्काराने तर, कै. पै. हरिश्चंद्र बिराजदार यांच्या स्मरणार्थ रणजीत पाटील यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले.
आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्ण पदक मिळविण्यासाठी आपल्या पैलवानांना प्रशिक्षण चांगल्या दर्जाचे हवे आहे. त्यासाठी महाराष्ट्रातून गुणवान पैलवान निवडले जाणार आहेत आणि त्यांच्या प्रशिक्षणासहीत सर्व खर्च पैलवान फाउंडेशन करणार आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील सुवर्ण पदकांचा दुष्काळ कमी करण्यासाठी आम्ही महाराष्ट्रातील सर्व पैलवान एकत्र येऊन काम करणार आहोत, असे ज्ञानेश्वर मांगडे यांनी सांगितले.
या कार्यक्रमास पैलवान फाउंडेशनचे संस्थापक ज्ञानेश्वर मांगडे, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सचिव बाळासाहेब लांडगे, ज्येष्ठ उद्योगपती पै. पंढरीनाथ पठारे व पै. अप्पासाहेब खुटवड, महाराष्ट्र केसरी दत्ता गायकवाड, अर्जुन पुरस्कार विजेते पै. काका पवार, पै. मंगलदास बांदल, पै. संदीप भोंडवे, पै. तात्यासाहेब भिंताडे, नगरसेवक पै. बाळासाहेब धनकवडे, हिंद केसरी पै. अमोल बराटे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते पै. कैलास मोहोळ, पै. अशोक शिर्के, पै. सतिश शिंदे, पै. कुलदीप तात्या कोंडे, सरहद संस्थेचे संस्थापक संजय नहार, चाटे शिक्षण समुहाचे फुलचंद चाटे आदी मान्यवर उपस्थित होते.