पुणे – सार्वजनिक वाहतुकीत पादचारी हाही अत्यंत महत्त्वाचा घटक असून पादचारी नागरिकांना प्रोत्साहन मिळावे, त्याचे महत्त्व समजावे, या उद्देशाने पुणे महापालिकेच्या माध्यमातून ११ डिसेंबर रोज पादचारी दिन साजरा करणार आहोत. येत्या ११ डिसेंबर रोजी हे आयोजन करण्यात करण्यात आले असून पुणे शहर पादचारी दिन साजरा करणारे देशातील पहिले शहर असणार आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, पोलीस अधिकारी आणि महापालिकेच्या विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसमवेत घेतलेल्या बैठकीत पादचारी दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. पादचारी दिन कसा साजरा करण्यात यावा, दरवर्षी साजरा करण्यासाठी काय काय करावं? या संदर्भात या बैठकीत चर्चा झाली. यावेळी स्वयंसेवी संस्थांच्या वतीने सुजित पटवर्धन, हर्षद अभ्यंकर, प्रांजली देशपांडे, सूरज जयपूरकर, अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमणार यांच्यासह पथ विभाग, मेट्रो, वाहतूक पोलीस अधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी उपस्थित घटकांकडून पादचारी दिन कसा साजरा करण्यात यावा, याबद्दल मते जाणून घेतली.
पादचारी दिनाबाबत माहिती देताना महापौर मोहोळ म्हणाले, पादचारी दिनाच्या निमित्ताने शहरातील पादचारी मार्गांची दुरुस्ती, पादचारी भुयारी मार्गांचे नूतनीकरण, सीसीटीव्ही कॅमेरा आणि लाईट्स अशा विविध विषयांवरही काम करण्यात येणार आहे. हा उपक्रम म्हणजे केवळ एकदिवसीय इन्व्हेंट न करता, यात भरीव काम करण्याचा आपला मानस आहे’.
‘भारतातील अनेक शहरांमध्ये सहसा पादचाऱ्यांची सोय आणि सुरक्षितता ह्याकडे दुर्लक्ष होत आले आहे. पुण्यामध्ये मात्र स्ट्रीट डिझाईन गाईडलाइन्स, पादचारी घोरण, नॉन मोटराईइड वाहतूक समिती अशा अनेक घटकांमुळे हे चित्र पालटण्यास काही अंशी सुरुवात झाली आहे. तरीही या सुधारणांना अजून व्यापक पाठिंबा मिळाल्यासच आपले शहर खऱ्या अर्थाने पादचारी- स्नेही होण्याच्या दिशेने वाटचाल करू शकेल. पर्यावरण दिन, महिला दिन असे दिवस गेली कित्येक वर्षे सातत्याने साजरे झाल्यामुळे त्या त्या विषयाबाबत बरीच जागृती आणि सुधारणा होण्यास हातभार लागला आहे. पादचारी दिन साजरा केल्यानेही असाच फरक पडेल, ही ह्या दिनामागची संकल्पना आहे, असेही महापौर मोहोळ म्हणाले.

