पुणे -आज ११ डिसेंबर हा पुणे शहराचा पादचारी दिन घोषित करून महापौर मुरलीधर मोहोळ यांनी प्रत्यक्षात पादचाऱ्यांसह सर्वांचीच थट्टा केल्याचा आरोप मनसेचे शहर अध्यक्ष ,नगरसेवक वसंत मोरे यांनी येथे केला .एकीकडे पुण्यात लक्ष्मी रस्त्यावर पादचारी दिन साजरा होत असतांना मनसे च्या वतीने प्रत्यक्षात पादचाऱ्यांची महापालिकेने आजवर कशी थट्टा केलीय याचा पंचनामा करता येईल अशा वास्तव्याचे चित्रण करून ते सोशल मीडियातून प्रसारित केले. यावेळी संपुर्ण शहरातील पदाधिकारी आजी माजी नगरसेवक विभाग अध्यक्ष शाखा अध्यक्ष महिला सेनेचे पदाधिकारी व मनसेच्या सर्व अंगीकृत संघटनांनी सहभाग घेतला होता.

शहरात विविध ठिकाणी घेतलेल्या कार्यक्रमांचा पंचनामा शहरातील पदपथांची दुरावस्था दाखवत मनसे वमनसेच्या पर्यावरण सेनेने केला. मनसे पर्यावरण शहर अध्यक्ष नितीन जगताप यांच्या माध्यमातून जनहित कक्षाचे शहर अध्यक्ष नरेंद्र तांबोळी यांच्या उपस्थितीत पुणे शहराच्या आठही मतदारसंघामध्ये विभाग अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली पदपथांवरील अतिक्रमणे आणि पादचाऱ्यांच्या हक्काची होत असलेली पायमल्ली याचा लेखाजोखा फेसबुक live च्या माध्यमातून प्रत्यक्षपणे मांडण्याचा प्रयत्न केला . वास्तविकपणे पादचाऱ्यांना रस्त्यांवर प्रथम प्राधान्य असायला हवे, पदपथ अतिक्रमणमुक्त असावेत, झेब्रा क्रॉसिंगचे रंग सुस्पष्ट असावेत, पादचाऱ्यांचे रस्ता ओलांडण्यासाठीचे सिग्नल्स दुरुस्त असावेत, अपंगांसाठी आणि दृष्टीहीन लोकांसाठी पदपथ सुस्थितीत असावेत अशा मागणीचे फलक घेऊन महापौर मुरलीधर मोहोळ, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांच्या प्रभागातलाच विरोधाभास दर्शवत मनसे शहर अध्यक्ष वसंत मोरे यांनी महापौर यांना खुले आव्हान दिले आहे. फक्त 1 दिवस पादचारी दिन साजरा करून जनतेच्या डोळ्यात धूळफेक न करता पादचाऱ्यांचे हक्क अबाधित ठेवले आणि पदपथ अतिक्रमणमुक्त झाले तरच पादचारी दिन सार्थकी लागला असे म्हणता येईल व दररोजच पादचारी दिन साजरा होईल असे वसंत मोरे यांनी म्हटले . तुम्ही दुसऱ्या प्रभागात चमकोगिरी करण्यापेक्षा स्वतःच्या प्रभागाची दुरावस्था दूर करावी असे म्हणत मोरेंनी स्वतःच्या प्रभागातील सलग 3 किलोमीटरच्या उत्कृष्ट अशा पदपथावरून पायी फेरी मारली.
यानिमित्ताने पुणे शहरात इतर सगळ्या विरोधी पक्षांपेक्षा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हाच प्रखर विरोधी पक्ष असल्याचे अधोरेखित झाले आहे. आगामी काळात पुणे शहराच्या आणि जनतेच्या हक्कासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना हाच एकमेव पर्याय असल्याचे सांगून वसंत मोरेंनी शासन प्रशासनाला धारेवर धरले.

