सुतारंकोंड-तळीये गावातील आपत्तीग्रस्त रुग्णांची जे.जे.रुग्णालयात घेतली भेट
मुंबई, दि. २६ जुलै – कोकणसह पश्चिम महाराष्ट्रामध्ये निसर्गाचा प्रकोप होऊन हजारो लोक आपत्तीग्रस्त झाले असून, त्यांचे तात्काळ पुनर्वसन करण्याची गरज आहे. या आपत्तीग्रस्तांना राज्य सरकारने तातडीने आर्थिक स्वरुपात मदत द्यावी.सरकारने या संकटाच्या परिस्थितीत केवळ इच्छाशक्ती दाखवून चालणार नाही तर आपतग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी तातडीने अंमलबजावणी करावी, अन्यथा सर्व पूर्वपदावर झाल्यानंतर सरकार वरातीमागून घोडे नाचवणार असेल व योजनांवर भर देणार असाल तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही, असे विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आज स्पष्ट केले.
अतिवृष्टीमुळे दरडीखाली सापडलेल्या पोलादपूर तालुक्यातील सुतारकुंड व महाड येथील तळीये गावांमधील आपत्तीग्रस्त रुग्णांवर सध्या मुंबई येथील जे.जे.रुग्णालयात उपचार सुरु असून विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आज त्यांची भेट घेऊन १६ रुग्णांची विचारपूस केली त्यावेळी संबंधित डॉक्टरांना रुग्णांची अधिक काळजी घेण्याबाबत सूचना दिल्या, तसेच काही अधिक मदत आवश्यक असल्यास भाजप आपल्यासोबत असल्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
दरेकर म्हणाले, भेदरलेल्या मनस्थितीमध्ये असलेल्या लोकांना आधार आणि दिलासा देण्याची गरज आहे. जे. जे. रुग्णालयात दाखल केलेल्या रुग्णांची परिस्थिति काय आहे? त्यांच्यासाठी उपाययोजना काय आहे? हे पाहण्यासाठी आलो आहे. आज ते बेडवर असतानाही त्यांना भविष्याची चिंता लागून राहिली आहे.हे जखमी सध्या मानसिकदृष्ट्या कमकुवत झाल्याचे दरेकर यांनी सांगितले.
राज्यात पूरग्रस्त झालेल्या नागिरकांचे पुनर्वसन भविष्यात तातडीने करण्याची आवश्यकता आहे. अत्यंत दयनीय परिस्थिति उद्भवली आहे, परंतु निसर्गाचा कोप झाल्यामुळे या गोष्टींना सामोरे जावे लागत आहे. अनेक रुग्ण स्थिरावलेले असले तरी काही रुग्णांचे हात किंवा पाय कामातून गेले आहेत. परंतु शेवटी त्यांचा जीव वाचविण्याचा डॉक्टरांचा प्रयत्न आहे. त्यामुळे सरकारने सुद्धा त्यांच्या पुनर्वसनाची काळजी घ्यावी, अशी मागणी दरेकर यांनी केली.
केवळ इच्छाशक्ती नको…तर आपतग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी सरकराने तातडीने मदत करावी-विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर
Date:

