मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम आणि किंमती वस्तूंच्या देवाणघेवाणीची तक्रार करण्यासाठी टोल फ्री क्रमांक कार्यान्वित करण्यात आला
पणजी, 25 जानेवारी 2022
गोव्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, उमेदवारांच्या निवडणुकीशी संबंधित खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी पणजीच्या आयकर विभागाच्या मुख्य (तपासणी) संचालकांनी नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे. हा कक्ष अहोरात्र कार्यरत असेल. निवडणूक खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी नोडल अधिकारी म्हणून पणजीच्या आयकर विभागाचे (तपासणी) अतिरिक्त संचालक श्रीधर डोरा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पणजी येथील पट्टो प्लाझामध्ये असलेल्या ट्रायस्टार इमारतीत तिसऱ्या मजल्यावरील 304 क्रमांकाच्या खोलीत हा अहोरात्र नियंत्रण कक्ष सुरु झाला असून मतदारांना प्रभावित करण्यासाठी किंवा लाच देण्यासाठी रोख रक्कम अथवा इतर वस्तूंचा वापर होत असल्याचा संशय असल्यास त्या बाबतच्या तक्रारी आणि माहिती या कक्षाला कळविता येतील. आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीमध्ये बेहिशोबी अथवा काळ्या पैशाच्या वापराला चाप लावण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने जारी केलेल्या निर्देशांनुसार हा नियंत्रण कक्ष उभारण्यात आला आहे.
ज्या व्यक्तींना निवडणुकीच्या काळात मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम किंवा मूल्यवान वस्तूंचा साठा, मालकी किंवा व्यवहार होत असल्याची माहिती असेल त्यांनी त्याबाबत खाली दिलेल्यापैकी कोणत्याही एका मार्गाने आयकर विभागाला सूचित करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
| Toll Free Number | 1800-233-3941 |
| Mobile Number/ Whatsapp Number | 8275803725/ 9403809343 |
| goaelections@incometax.gov.in |
पणजीच्या आयकर विभागाचे मुख्य (तपासणी) संचालक कृष्ण मुरारी यांनी म्हटले आहे की, गोवा राज्यात 14 फेब्रुवारी 2022 होत असलेली राज्य विधानसभा निवडणूक -2022 पार पडेपर्यंत उमेदवारांच्या निवडणुकीशी संबंधित खर्चावर लक्ष ठेवण्यात तपासणी संचालनालय अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहे. ते पुढे म्हणाले की, निवडणूक प्रक्रियेदरम्यान बेहिशेबी पैशांची भूमिका नियंत्रणात आणून, निवडणूक प्रक्रिया खुल्या वातावरणात, न्याय्य आणि पारदर्शक पद्धतीने होण्याची सुनिश्चिती करण्यात संचालनालयाचा मोठा वाटा आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, पणजीचे तपासणी संचालनालय निवडणूक प्रक्रियेत वापरण्यासाठी उपयोगात आणला जाणारा बेहिशेबी पैसा शोधून काढणे आणि ताब्यात घेणे यासाठी सक्रियतेने पावले उचलत आहे.

