पुणे : श्री जंगली महाराज देवस्थान ट्रस्ट तर्फे सद्गुरु श्री जंगली महाराज यांच्या १३२ व्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त महाराजांच्या पादुकांची पालखी मिरवणूक श्री रोकडोबा मंदिर, शिवाजीनगर गावठाण येथून शिवाजीनगर गावठाण परिसरात काढण्यात आली. टाळ-मृदूंगाचा गजर आणि कपाळी गुलाल-बुक्का लावून भाविक मिरवणुकीत उत्साहाने सहभागी झाले होते.
सद्गुरु श्री जंगली महाराज भजनी मंडळातील वारक-यांनी विविध भजने,अभंग,गजर यावेळी सादर करीत सामान्यांनाही मिरवणुकीत सहभागी करून घेतले. ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र तांबेकर,उपाध्यक्ष चंद्रकांत शिरोळे,सेक्रेटरी शिरीष लोखंडे यांसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उत्सवाचे नियोजन केले आहे. फुलांनी पालखी सजविण्यात आली होती.

दरवर्षी प्रमाणे यंदाही गव्हाच्या खिरीचा प्रसाद तयार करण्यात आला. खिरीचा प्रसाद हे सन १९६५ पासून उत्सवाचे वैशिष्ट्य आहे. महाराजांची आरती झाल्यानंतर त्याच्या अग्निने चूल पेटविली जाते. तब्बल ६ ते ७ तास सलग १० ते १२ सेवेकरी ही १२०० किलो खीर तयार करतात. सुमारे २५० किलो गूळ, २०० किलो साखर, २० किलो ड्रायफ्रुट वापरून ही खीर केली जाते. तब्बल ५००० हून अधिक भाविक हा प्रसाद ग्रहण करतात. भव्य दिव्य कढईमध्ये खीर तयार करतानाचे दृश्य पाहण्याकरिता देखील अनेक भाविक गर्दी करतात.

उत्सवात अनेक सांगीतिक कार्यक्रम झाले. तसेच विविध विषयांवर मान्यवरांची व्याख्याने हे उत्सवाचे वैशिष्ट्य असते. यंदा डॉ.योगेश गोडबोले, डॉ.सागर देशपांडे, दत्तात्रेय धाईंजे, श्रीनिवास पेंडसे, प्रा.मुक्ता गरसोळे- कुलकर्णी, डॉ. दत्तात्रेय तापकीर, डॉ अविनाश भोंडवे, डॉ. चंद्रशेखर टिळक, चंद्रकांत शहासने, विद्या लव्हेकर, सचिन पवार, आदित्य अभ्यंकर, डॉ. रवींद्र भोळे आदी मान्यवरांची व्याख्याने उत्सवात झाली.

