पैसा… प्रत्येकाला पैशाची गरज असते. पण, गरज असताना पैसा हातात असणं महत्त्वाचं असतं. वेळ वाकडी येते तेव्हा घराचे वासे पण फिरतात, असं म्हणतात. आणि त्याचा प्रत्यय आपल्याला कधीनाकधी येतोच. अशा नशीबाच्या फेऱ्यात अडकलेल्या तरुणाच्या विचित्र परिस्थितीवर बेतलेला, रंगभूषाकार ते निर्माता असा प्रवास असलेले शिवविलाश चौरसिया यांच्या ‘द नाईन फिल्म्स’ संस्थेची निर्मिती असलेला ‘पैसा पैसा’ हा पहिला चित्रपट 20 मे रोजी प्रदर्शित होत आहे.
प्रेम, मैत्री, नातेसंबंध, नैतिकता, कर्तव्य आणि पैसा या सर्वांची सांगड घालताना परिस्थितीच्या चक्रव्युहात अडकलेल्या एका तरुणाची ही कथा आहे. आपल्या दुरावलेल्या अभिनेत्री पत्नीशी पुन्हा जुळवून घेण्यासाठी तिला भेटायला निघालेल्या एका दिग्दर्शकासमोर अचानक एक संकट उभे राहते. त्यातून सहजगत्या बाहेर पडू, असा विश्वास असलेला नायक नियतीच्या फेऱ्यात गुरफटतो. त्या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी त्याने केलेला थरारक रोलर कोस्टर प्रवास म्हणजे चित्रपट पैसा पैसा. जाहिरात निर्मिती क्षेत्रातील आघाडीचे नाव ॲडमॅन जोजी रेशल जॉब यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
हॅण्डसम् बॉय सचित पाटील आणि सर्वांची लाडकी अभिनेत्री स्पृहा जोशी पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर एकत्र येत आहेत. त्यांच्यासोबत अभिनेता मिलिंद शिंदे, आशिष नेवाळकर, पुष्कर श्रोत्री, दीपाली सय्यद, राजेंद्र चावला, पंकज विष्णू, माधव अभ्यंकर, विनिता जोशी, विकास पाटील आदी कलाकारांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. सचिन दरेकर यांनी संवाद लेखन केले आहे. सिनेमॅटोग्राफी एस. प्रसाद चौरसिया – अणिक वर्मा यांची असून मुंबईतील अंधेरीच्या सतत गजबजलेल्या रस्त्यांवर एका अनोख्या पद्धतीने सिनेमॅटोग्राफीतील कल्पकता पणाला लावून शूटिंग केले आहे.
अवघ्या चोवीस वर्षांच्या रॉकस्टार सोहम् पाठक या उमद्या संगीतकाराने दिलेलं संगीत श्रवणीय आहे. गायक विशाल दादलानी, अवधूत गुप्ते, आदर्श शिंदे आणि नीती मोहन यांनी गीतांना स्वरसाज चढवला आहे.
प्रेमाच्या पलिकडे जाऊन जबाबदारी पार पाडणाऱ्या एका कल्पक, कर्तव्यदक्ष पुरुषाची संकटातून बाहेर पडण्यासाठी लागणाऱ्या पैशासाठी चाललेली वणवण ‘द नाईन फिल्म्स’च्या ‘पैसा पैसा’ या चित्रपटातून अतिशय रंजकपणे मांडण्यात आली आहे.