मुंबई- राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आल्यापासून भाजपाकडून सरकार पडण्याबाबत विधानं केली जात होती. आता भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी खळबळजनक दावा केला आहे. शिवसेनेच्या राज्यातील १८ खासदारांपैकी १३ ते १४ खासदार भाजपाच्या संपर्कात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. यासंदर्भात प्रसाद लाड यांनी शिवसेना खासदारांनी पक्षाकडे नाराजी व्यक्त केली असल्याचं सांगत त्या आधारावर २०२४मध्ये हे खासदार हिंदुत्ववादी भूमिका घेणाऱ्या पक्षासोबत जोडले जातील, असा दावा केला आहे. त्यामुळे आता शिवसेनेचे हे नेमके कोणते खासदार आहेत, यावरून चर्चा सुरू झाली आहे.
खासदारांची बैठक
दिल्लीमध्ये शिवसेना खासदार संजय राऊतांनी शिवसेनेच्या इतर खासदारांची बैठक घेतल्याचं सांगितलं जात आहे. या बैठकीमध्ये शिवसेना खासदारांनी संजय राऊतांकडे तक्रारींचा पाढा वाचल्याचं देखील बोललं जात आहे. या चर्चांमुळे तर्क-वितर्कांना उधाण आलं असून नेमक्या काय राजकीय घडामोडी सुरू आहेत, याविषयी अंदाज लावले जात आहेत.
शिवसैनिक खासदार झालेत ते मोदींच्या नावाने निवडून आले आहेत. पण राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेनेची हिंदुत्वाची भूमिका बदलली आहे. विकासाचा मुद्दा सोडला आहे,“त्यांच्या मनातली तळमळ, मळमळ त्यांनी बोलून दाखवली आहे. माझ्या मते शिवसेना खासदारांना सन्मान मिळत नाही. निधी मिळत नाही. पालकमंत्र्यांकडून त्यांना विचारलं जात नाही ही त्यांच्या मनातली खदखद आहे.”, असं प्रसाद लाड म्हणाले आहेत.

