ओतूर-दि.८(संजोक काळदंते)
केंद्र सरकारने शेतकऱ्याला महत्व न देता फक्त उद्योगपतींचा विचार करून विकासाच्या फक्त गप्पाच मारल्या आहेत यामुळे राज्यातील आणि केंद्रातील सरकार हे जनतेचे नसून उद्योगपतींचे आहे कि काय असे धोरण अवलंबून शेतीमालाला बाजारभाव नाही,दुधाला भाव नाही राज्यातील कारखानदारी धोक्यात आणून बाहेरची कारखानदारी राज्यात आणली आणि शेतकऱ्याची वाट लावलीय असे प्रतिपादन राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे राज्याचे उपाध्यक्ष अतुल बेनके यांनी ओतूर येथे झालेल्या कांदा आंदोलन व रस्ता रोको प्रसंगी केले.
यावेळी पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष जालींधर कामठे,कृषी उत्पन्न बाजार समितिचे सभापती रघुनाथ लेंडे,शरद लेंडे,तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष पांडुरंग पवार,महिला अध्यक्ष सुरेखा वेठेकर,शरद सहकारी बँकेचे संचालक विनायक तांबे,शिरीष बोऱ्हाडे,ज्ञानदेव बोऱ्हाडे,सुरज वाजगे,तान्हाजी डुंबरे,डॉ.मनिष वोरा,सुभाष हांडे,सबाजी लोहोटे,संतोष तांबे,संदेश एरंडे,जयप्रकाश डुंबरे,तुषार थोरात,योगेश डुंबरे,दिनेश दुबे,बाळासाहेब खिल्लारी,नासीर मणियार,रईस मणियार,वैभव तांबे,गणपत कवडे,विलास पडवळ,सुदाम घोलप,सचिन घोलप,देविदास तांबे,लक्ष्मण शिंदे,जनार्दन खामकर,शिवाजी शेरकर,मोहित ढमाले,जालींधर पानसरे,राजेंद्र फापाळे,राजेंद्र वायकर,मनीषा वारे आदींनी मनोगत व्यक्त केले.अतुल बेनके यांनी बोलताना सांगितले देशाचे माजी कृषीमंत्री शरद पवार यांनी शेतकऱ्याच्या हिताचे अनेक निर्णय घेतले मात्र आता या देशाचा आणि राज्याचा कृषीमंत्रीच शेतकरी जनतेला माहित नाहीय ही शोकांतिका असून काही लोक स्वतःला फक्त शेतकऱ्यांचे नेते म्हणवतात मात्र शेतकऱ्याच्या ज्वलंत प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी काहीही करीत नसून शेतकऱ्याच्या नावाचा गैरवापर करून स्वतःची पोळी भाजून घेत आहेत त्यांचाही बंदोबस्त हा शेतकरी केल्याशिवाय राहणार नाही अशा कडक शब्दात अतुल बेनके यांनी टीकास्र सोडले.येणाऱ्या आठवडा भरात शासनाने शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव द्यावा तसेच कांद्याला पुरेसे अनुदान न दिल्यास हे कांदा आंदोलन तीव्र होत जाणार असल्याचा इशारा बेनके यांनी दिला.तर जालींधर कामठे म्हणाले कि उद्योगपतींना,मंत्र्यांना अच्छे दिन आले मात्र आम जनतेला आणि शेतकऱ्याला अच्छेदिन आले नाहीत.हे सरकार जनतेची फसवणूक करीत आहे.या विकासाच्या नुसत्या गप्पा मारणाऱ्या सरकारला धडा शिकवा असे आवाहन यावेळी बोलताना कामठे यांनी केले.ऊस,दुध,कांदा प्रश्न गंभीर होत चालले असताना रेल्वे स्टेशनवर वाय फाय बसविण्यासाठी लाखो रुपये सरकार उडवीत आहे या सरकारला लाज वाटायला हवी अशा प्रतिक्रिया जमलेल्या शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या.ईडा पीडा जाओ आणि बळीचे राज्य येवो असे आता न म्हणता उद्योगपतींचे राज्य आणणाऱ्या,डांसबार वरील बंदी उठवून शेतकऱ्याच्या कांद्यावर निर्यात बंदी केली अशा नाकर्त्या व आश्वासने न पाळणाऱ्या खोटारड्या या केंद्र आणि राज्य सरकारला हद्दपार करा अशा प्रकारच्या कठोर शब्दात जमलेल्या शेतकऱ्यांनी मनोगते व्यक्त केली.यावेळी शेतकऱ्यांनी कांदा रस्त्यावर ओतून नगर-कल्याण महामार्गावर रस्ता रोको केला.व सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या.तसेच शेतकऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन महसूल विभागास देण्यात आले ते निवासी नायब तहसीलदार पंकज मगर व मंडलअधिकारी जी.एन.थोरवे यांनी स्वीकारले.तर रस्ता रोको आंदोलनावेळी जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी जयश्री देसाई,सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र थोरात,बजरंग बाडीवाले तसेच नारायणगाव,जुन्नर,ओतूर येथील ,५ पोलीस उपनिरीक्षक, ४० पोलीस कर्मचारी,२५ होमगार्ड बंदोबस्ताकरिता तैनात होते यावेळी आंदोलनकर्त्या २२ जणांवर मुंबई पोलीस कायदा कलम ६८ प्रमाणे कारवाई करून ताब्यात घेतले व सोडून दिले असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र थोरात यांनी सांगितले.
चौकट :-
[ माणूस आपला आणि तालुका खपला अशा बोचरी टीका आंदोलना दरम्यान जुन्नरच्या लोकप्रतिनिधीवर नाव न घेता अतुल बेनके यांनी केली यावर शेतकऱ्यांमधून मोठा हशा झाला ]



