जुन्नर (संजोक काळदंते) -सध्या सर्वत्रच प्लास्टिकच्या पिशव्या तसेच प्लास्टिकच्या अन्य विविध प्रकारच्या वस्तू वापरण्याच्या प्रमाणात मोठी वाढ झाली असून भविष्यात प्रत्येक मानवाला प्लास्टिकचे मोठे दुष्परिणाम भोगावे लागणार आहेत. त्यामूळे नागरिकांमध्ये प्लास्टिक न वापरण्याबाबत जाणीव जागृती व्हावी तसेच भविष्यातील प्लास्टिकच्या वापरामूळे होणारे धोके टाळायचे असतील तर प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांनी प्लास्टिकमुक्त भारत ही चळवळ घराघरात पोहोचविणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन भारत विकास परिषदेचे ओतूर शहर अध्यक्ष डॉ. वैभव गायकर यांनी केले.
ओतूर ( ता. जुन्नर ) येथील जि. प. प्राथमिक शाळेत भारत विकास परिषद, ओतूर शहर कचरा व्यवस्थापन समिती व ओतूर ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कचरा व्यवस्थापन व वर्गीकरण उपक्रमांतर्गत आयोजित कार्यक्रमात उपस्थित विद्यार्थी, शिक्षक व पालकांना मार्गदर्शन करताना डॉ. गायकर बोलत होते.
प्लास्टिकच्या वस्तूंचा दैनंदिन जीवनात मोठा वापर वाढला असून त्याचे मानवाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होणार असल्याने प्रत्येकाने प्लास्टिकचा वापर टाळण्याचे आवाहन डॉ. गायकर यांनी उपस्थितांना केले.
या कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिका व पर्यावरण तज्ज्ञ डॉ. रश्मी घोलप यांनी वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धनाचे महत्त्व सांगून विविध वृक्षांचे बीज संग्रहण करुन त्याची शाळेत व इतरत्र लागवड करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले. त्यासाठी शाळेत भारत विकास परिषदेच्या वतीने शाळेतील प्रत्येक वर्गात बीज संग्राहक कुंभ ठेवण्यात येतील असेही त्यांनी सांगितले.
यावेळी पंचायत राज पुरस्कार प्राप्त आदर्श गाव ठिकेकरवाडीचे सरपंच संतोष ठिकेकर यांनी कच-याचे योग्य विघटन करुन त्याची कशी विल्हेवाट लावायची याचे उपस्थितांना मार्गदर्शन करुन कच-यापासून खतनिर्मितीबाबत माहिती दिली.
यावेळी भारत विकास परिषदेच्या वतीने जि. प. प्राथमिक शाळा क्रमांक एक व दोन मधील प्रत्येक वर्गासाठी कच-याच्या प्रकारानुसार वर्गीकरण करुन कचरा साठविता यावा यासाठी कचरा डबे तसेच बीज संग्राहक कुंभाचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला विवेक घोलप, डॉ. सविता फलके, गणेश तांबे, डॉ. रोहिणी गायकर, दिपाली डुंबरे, देविदास तांबे, मुख्याध्यापक रामचंद्र तितर, ज्येष्ठ व आदर्श शिक्षिका लीला धिरडे, ग्रामशिक्षण समिती तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी, दोन्ही शाळांचे शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.हा कार्यक्रम सिव्हिल ईंजिनिअर गणेश तांबे यांच्या कचरा वर्गीकरण या संकल्पनेतून राबविण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.यापुढेही भारत विकास परिषदेसोबत ठिकठिकाणी अशा प्रकारचे कार्यक्रम घेऊन स्वच्छ भारत अभियानास मदत करनार असल्याचे ईंजि.गणेश तांबे म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन मच्छिंद्र डुंबरे यांनी केले तर राजेंद्र आरोटे यांनी आभार मानले.
प्लास्टिकमुक्त भारत ही चळवळ शालेय विद्यार्थ्यांनी घराघरात पोहोचविणे आवश्यक – डॉ. वैभव गायकर
Date:

