मुंबई- कृषी कायद्याविरोधातील शेतकरी आंदोलनाने आता मोठे रुप घेतले आहे. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला आणि उद्या(8 डिसेंबर) होणाऱ्या भारत बंदला अनेक पक्षांनी पाठिंबा दिला आहे. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन विरोधकांवर निशाना साधला. यावेळी त्यांनी विरोधकांची भूमिका दुटप्पी असल्याचे म्हटले.
यावेळी फडणवीस म्हणाले की, ‘ज्या कायद्यांच्या विरोधात आंदोलन सुरू आहे, ते कायदे राज्यात 2006 मध्ये काँग्रेस राष्ट्रवादी सत्तेत असताना हे कायदे करण्यात आले होते. मला आश्चर्य वाटतं की, ज्या गोष्टी राज्यात आधीच झाल्या, त्या केंद्राने केल्या तर यांना आक्षेप का आहे ? बाजार समित्या रद्द करण्यात येईल असे काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात लिहिले आहे. 27 डिसेंबर 2013 मध्ये राहुल गांधींनी पीसीमध्ये एपीएमसीमधून भाजीपाला आणि फळे काढण्यात येतील असे म्हटले होते,’ असे फडणवीस म्हणाले.
‘वाहत्या गंगेत हात धुवून घेण्याचा प्रकार ‘
फडणवीस पुढे म्हणाले की, ‘ शरद पवारांनी 2010 मध्ये अनेक पत्र लिहून कृषी सुधारणा सुचवल्या होत्या. पवारांच्या आत्मचरित्रात याबाबत उल्लेख आहे. डीएमकेनेही 2016 मध्ये असेच आश्वासन दिले होते. आम आदमी पक्षाने तर हे कायदे मंजूर केले आहेत. अकाली दल 12 डिसेंबर 2012 रोजी एपीएमसी दलालांचे अड्डे बनले आहेत असे म्हटले होते. खरतर, राजकीय पक्षांचा विरोध म्हणजे वाहत्या गंगेत हात धुवून घेण्याचा प्रकार आहे,’ अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
विरोधकांची दुहेरी आणि लज्जास्पद वृत्ती समोर आली- रविशंकर प्रसाद
यापूर्वी केंद्रीय कायदे मंत्री रविशंकर प्रसाद यांनी विरोधी पक्षांवर जोरदार हल्लाबोल केला. ‘शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या विरोधी पक्षांची दुहेरी आणि लज्जास्पद वृत्ती समोर आली, अशी टीका त्यांनी केली. तसेच, ‘विरोधक आपला राजकीय हेतू साध्य करण्यासाठी आंदोलनात सहभागी झाल्याचे’ ते म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले की, “आम्ही विरोधी पक्ष, विशेषतः काँग्रेस, राष्ट्रवादी आणि त्यांच्यासोबत असलेल्या इतर पक्षांच्या लज्जास्पद दुहेरी मानसिकता देशासमोर आणण्यासाठी आलो आहोत. फक्त आपले राजकीय अस्तित्व वाचवण्यासाठी ते कोणत्याही सरकार विरोधी आंदोलनात सहभागी होत आहेत, असा घणाघातही त्यांनी यावेळी केला.

