डॉ. आंबेडकर पुतळा आणि छत्रपती शिवाजी महाराज स्मारक कार्यक्रमास विरोधी पक्षांनी उपस्थित राहू नये यासाठी गलिच्छ राजकारण केल्याचा आरोप
पुणे- महापालिका निवडणुकीच्या तोंडावर महापालिकेच्या आवारात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आणि छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे भूमिपूजन अशा कार्यक्रमांना विरोधी पक्षांचे नेते आणि नगरसेवक उपस्थित राहू नये म्हणून भाजपचे शहर अध्यक्ष आणि महापालिकेतील भाजपचे पदाधिकारी यांनी गलिच्छ राजकारण केल्याचा आरोप विरोधी पक्षनेत्या दिपाली प्रदीप धुमाळ यांनी केला आहे.
दिपाली धुमाळ म्हणाल्या आज महानगरपालिकेच्या वतीने महानगरपालिका आवारात भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे लोकार्पण सोहळा व छत्रपती शिवाजीमहाराज स्मारकाचे भुमिपुजन समारंभ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते संपन्न झाला . या कार्यक्रमाचे निमंत्रण मिळाले होते. परंतु पास मात्र आज सकाळी अकरा वाजता घरी मिळाले. हे पास दिल्यानंतर काही वेळाने महापौर कार्यालयातून निरोप आला की कार्यक्रमाला येताना कोरोनाची आरटीपीसीआर टेस्ट करून येणे आवश्यक आहे व तशा प्रकारचे रिपोर्ट देणे गरजेचे आहे असे सांगण्यात आले. खर तर ऐनवेळेस सत्ताधारी भाजप ने केलेले गलिच्छ राजकारण आहे. आधीच या दोन महापुरुषांचे फोटो जाहिराती मध्ये न टाकुन एक प्रकारचा अवमान केलेला आहे. आणि विरोधकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहूच नये अशा प्रकारची ऐनवेळेस नियोजन केले आहे. कोरोना टेस्ट करून घ्यायची बंधनकारक होते तर यासंबंधी ची सुचना दोन दिवस अगोदर देणे आवश्यक होते. ही टेस्ट केल्यानंतर साधारण चोवीस तासांनी रिपोर्ट मिळतो याची जाणीव असताना सुध्दा सत्ताधाऱ्यांनी प्रशासनाला का सुचना दिल्या नाहीत. हे जाणीवपूर्वक केले कृत्य आहे. या भाजपच्या प्रवृत्तीचा आम्ही निषेध करतो. महापालिकेच्या एका चांगल्या कार्यक्रमाला आम्हाला ईच्छा असताना हजर राहता आले नाही. भाजप ने स्वत:च्या पक्षाचा अजेंडा राबवून कार्यक्रम केला.

