मुंबई दि. १५ डिसेंबर- निसर्ग चक्रीवादळामध्ये बाधित झालेल्या कोकणातील मच्छिमार बांधवांचे पंचनामे होऊन सुद्धा आज पर्यंत त्यांना आर्थिक मदत न मिळाल्यामुळे त्यांना ती नुकसान भरपाई त्वरित मिळावी, तसेच मुंबईतील ४२ कोळीवाड्याचे सीमांकनाचे काम हे मागच्या सरकारने सुरू केले असून त्यातील फक्त काही कोळीवाड्याचे सीमांकनाचे काम हे या नव्या सरकारच्या काळात थांबवले असून ते तातडीने सुरु करण्याच्या मागणीसाठी कोळी महासंघ आयोजित आदिवासी कोळी जमात बांधवांचा इशारा मोर्चा आज कोळी महासंघाचे अध्यक्ष आमदार रमेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आला होता. माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर, आमदार आशिष शेलार, आमदार विनायक मेटे आदी याप्रसंगी उपस्थित होते.
कोळी महासंघाचे अध्यक्ष आमदार रमेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदान येथे मोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चेतन पाटील यांच्यासह मोठ्या प्रमाणात कोळी बांधव उपस्थित होते. कोळी समाजाच्या मुख्य मागण्या सरकारने तातडीने पूर्ण कराव्या अशी मागणी कोळी समाजाने केली आहे. महाराष्ट्रातील अनुसूचित जमातीतील बांधवाना जातीचा दाखला व वैधता हि सुलभरीत्या मिळण्याकरिता पी.वि. हरदास समिती नेमण्यात आली होती व सदरच्या समितीने अहवाल महाराष्ट्राने शासनाकडे सुपूर्द केला असून तो त्वरित लागू करावा अशी महासंघाची मागणी आहे.
वाशी ते मानखुर्द हा चौथा नवीन वाहतूक पूल होत असून तेथील मासेमारी करणाऱ्या आगरी – कोळी बांधवाना शिवडी – न्हावाशेवा पुलाच्या धर्तीवरच नवी मुंबईतील बाधीत होणाऱ्या मच्छिमारांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी महासंघाची मागणी आहे. मुंबईतील मासे विक्रेत्या महिलांच्या मच्छिमार्केटला संरक्षण देण्याची मागणीही महासंघाने सरकारकडे केली आहे.

