मुंबई, दि. २३ ऑक्टोबर – अंमली पदार्थाच्या आडून महाराष्ट्राची बदनामीचा करण्याचा डाव आखला जात असल्याचे मुख्यमंत्र्यांचे विधान दुदैर्वी आहे. मुख्यमंत्र्यांचे विधान म्हणजे महाराष्ट्र पोलिसांची बदनामी होत असल्याचे सांगत त्यांच्या आडून केवळ महाविकास आघाडी सरकारचा बचाव करण्याचा केविलवाणा प्रयत्न मुख्यमंत्र्यांकडून होत असल्याचे दिसत आहे. तसेच या सर्व घटनांच्या निमित्ताने मुख्यमंत्री महाराष्ट्र पोलिस व एनसीबी असा दुजाभाव निर्माण करुन केवळ केंद्र सरकार व राज्य सरकारमध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज केला.
प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना दरेकर म्हणाले की, मुख्यमंत्र्यांचे विधान मुख्यमंत्री म्हणून आश्चर्यकारक आहे व दुदैर्वी आहे. कारण देशात कुठेही ड्रग्जच्या घडत असलेल्या घटना वाईटच आहे. तसेच एखाद्या घटनेत तक्रारदार गायब असेल तरी कोणीही चिंता करण्याचे कारण नाही. तक्रारदार शोधून काढण्याचे काम पोलिंसाचे आहे. गृह खाते सरकारचेच आहे व या खात्याच्या गृहमंत्र्यांकडे पोलिस खाते आहेत, त्यामुळे त्यांच्याकडून योग्य तपास होऊ शकेल. कारण त्या पोलिस आयुक्तांनी आधीच्या काळात केवळ महाविकास आघाडी सरकारसाठी काम केले होते हे महाराष्ट्राने पाहिले आहे. परंतु आपल्या सरकारमध्ये काम केलेले माजी गृहमंत्रीच सध्या गायब आहेत, त्यावर कोणीही भाष्य करत नाही. पण केवळ सोयीचे बोलण्याची मुख्यमंत्री व सरकारची भूमिका असल्याची टिकाही दरेकर यांनी केली.
मुख्यमंत्र्यांनी औरंगाबादच्या कार्यक्रमात सांगितले की,न्यायालयीन खटल्यांचा निकाल गतीने लागला पाहिजे. त्यामुळे आता आपल्या सरकारमध्ये जे मंत्री विविध चौकशीच्या निमित्ताने सध्या संशयाच्या भोव-यात आहेत. त्यांच्या चौकशीचा आधी तपास करुन सत्य लोकांसमोर आणावे, तरच या प्रकरणांचा निकाल गती लागू शकेल असा टोलाही दरेकर यांनी लगावला.
मुख्यमंत्र्यांची काही दिवसांची वक्तव्ये पाहिली तर केंद्र व राज्य यांच्यामध्ये दुही निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतोय असा आरोप करताना दरेकर म्हणाले की, घटनात्मक गोष्टीवर कायदेशीर पेच निर्माण करुन केंद्र व राज्य असा वाद देशामध्ये उभा करण्याचे नियोजन होत आहे. कारण केंद्र व राज्याचे अधिकार काय आहेत याचा घटनेमध्ये स्पष्ट उल्लेख आहे. पण राज्यातील सरकारला जबाबदा-या पूर्ण करता येत नाही, म्हणून केंद्र व राज्य असा वाद निर्माण करायचा, आपण राज्य चालविताना अपयशी ठरल्यामुळे केंद्र सरकारवर ढकलून मोकळे व्हायचे. यासाठीच अशी प्लँन्ट वक्तव्ये होत असावीत असेही मत दरेकर यांनी व्यक्त केले.
केंद्र व राज्य सरकारमध्ये दरी निर्माण करण्याचा मुख्यमंत्राचा प्रयत्न विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर
Date:

