मुंबई, दि. २३ जून – राजावाडी रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार घेणा-या रुग्णांचा डोळा उंदराकडून कुरतडण्याचा प्रकार अतिशय धक्कादायक आहे. या भोंगळ कारभारामुळे येथील रुग्णालयाच्या दुरावस्थेचे धिंडवडे निघाले आहे. त्यामुळे येथील दुरावस्थेचा पर्दाफाश विधीमंडळ अधिवेशनात करण्यात येईल असा इशारा विधापरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज दिला.
मेंदूज्वर व लिव्हर या आजाराने त्रस्त श्रीनिवास यल्लपा (२४) हा तरुण बेशुद्ध अवस्थेत आयसीयूमध्ये उपचार घेत असताना उंदराने त्याच्या डाव्या डोळ्याचा काही भाग कुरतडल्याची खळबळजनक घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेची दखल घेत आज दरेकर यांनी तात्काळ रुग्णालयात जाऊन यल्लापा यांची भेट घेतली. तेथील आरोग्य व्यवस्थेचा भोंगळ कारभार उघडकीस आणला आहे. अशा घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी तातडीने युध्दपातळीवर उपाययोजना करण्याचे आदेश दरेकर यांनी पालिकेच्या रुग्णालय प्रशासनाला दिले.
संकटकाळात आरोग्यव्यवस्था हाताळण्यात महापालिका उत्तम ठरली. अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि इतर देशाने महापालिकेचा गौरव केला. कदाचित महापालिका अजूनही आपली पाठ थोपटण्यात व्यस्त आहे. पण जर पालिकेच्या रुग्णालयाची दुरावस्था असेल तर आपल्या त्या गौरवाचा फायदा काय? असा सवाल विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आज उपस्थित केला.
राजावाडी रुग्णालय अस्वच्छतेचं साम्राज्य
राजावाडी रुग्णालयात अस्वच्छतेचं साम्राज्य असून याला जबाबदार असणा-या रुग्णालय प्रशासनाची तात्काळ चौकशी करण्याचे निर्देश दरेकर यांनी दिले. या रुग्णालयाकडे प्रशासानाचे लक्ष नसल्याचे उघड होत आहे, त्यामुळे या विषयीचा प्रश्न अधिवेशनात मांडू असेही त्यांनी स्पष्ट केले.
राजावाडी रुग्णालयात पालिकेचे एमबीबीएस, एमडी डॉक्टर नसून आउटसोर्सिंग डॉक्टर आहेत, तसेच मुंबईतील अनेक पालिका रुग्णालयातही आउटसोर्सिंग डॉक्टर असल्याचे सांगताना दरेकर म्हणाले, एमडी, एमबीबीएस डॉक्टर नसताना कामचलाऊ डॉक्टरांकडून पालिका रुग्णालयांचे काम चालवणार असाल तर हे दुर्दैवी आहे. पालिका रुग्णांच्या जीवाशी खेळत आहात अशी टिकाही दरेकर यांनी केली.

