मच्छी विक्रेते कोळी बंधू व भगिनींना मोफत शितपेटी वितरण
मुंबई, दि. १९ फेब्रुवारी- कोळी समाज हा मुंबईचा मूळ मालक आहे. मुंबई शहराचा विकास होत असताना दुर्दैवाने कोळी समाज आजही उपेक्षित राहिला आहे. कोळी बांधवाचे अनेक प्रश्न आ वासून उभे राहिले आहेत. त्यामुळे आता मच्छिमार बांधवांचे जे काही प्रलंबित प्रश्न आहेत. त्या सर्व प्रश्नांना विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात वाचा फोडल्याशिवाय व त्या प्रश्नांना न्याय मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही असा ठाम विश्वास विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज व्यक्त केला.
भारतीय जनता पार्टी मच्छीमार सेलच्यावतीने बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील मच्छी विक्रेते कोळी बंधू व भगिनींना मोफत शितपेटी वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांच्या हस्ते कोळी बंधू व भगिनींना मोफत शितपेटीचे वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना दरेकर यांनी सांगितले की, आपले राजकीय हित साधण्यासाठी गेली अनेक वर्षे काही राजकीय पक्षांनी व राजकारण्यांनी मच्छिमार समाजाच्या माध्यमातून आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न केला. निवडणुकांचा काळ आला की काही राजकीय पक्षांना कोळी बांधवांची आठवण होते. मच्छिमार बांधवांच्या जीवावर अनेक नगरसेवक, आमदार व खासदार झाले. परंतु निवडणुकानंतर मात्र या सर्वांनी कोळी समाजाच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले. परंतु भाजपने कोळी समाजाला नेहमीच विधीमंडळात प्रतिनिधीत्व दिले. फडणवीसजी मुख्यमंत्री असताना त्यांनी मच्छिमार समाजाचे अनेक प्रश्न मार्गी लावले. कोळी बांधवाच्या विकासाच्या दिशेने भाजपा सरकारच्या काळात सुरुवात झाली. भविष्यातही कोळी बांधवाच्या विकासासाठी भाजपा कटीबध्द आहे, असेही दरेकर यांनी ठामपणे सांगितले.
भाजपा मच्छीमार सेलचे अध्यक्ष व कार्यक्रमाचे आयोजक चेतन पाटील कोळी बांधवांसाठी धडपडणारे सच्चे कार्यकर्ते आहेत. देवेंद्र फडणवीस साहेब आणि भारतीय जनता पार्टीने मच्छीमार समाजाच्या भावना व संवेदना समजणा-या कार्यकर्ता रमेश दादा पाटील यांना आमदारकीची संधी दिली. आमदार पाटील यांनी मच्छिमार वसाहतीमधील मच्छीमार बांधवांचे जे जे प्रश्न आहेत ते देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना सोडविण्याचा प्रामणिक प्रयत्न केला. आमदार पाटील यांची मच्छिमारांच्या प्रश्नांच्या प्रति असलेली धडपड मी बघितली आहे. आणि आता त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत चेतन पाटील आपल्या समाज बांधवांसाठी भगिनींसाठी काम करीत आहेत. चेतन पाटील यांच्या कार्याचा गौरव म्हणून व कोळी समाजाला प्रतिनिधित्व देण्याच्या दृष्टीने आपण त्यांना रायगड सहकारी बँकेवर संचालकपदाची जबाबदारी दिली व त्यांच्याकडे रायगड सहकारी बँकेचे उपाध्यक्षपदाचीही जबाबदारी सोपविली आहे.
भविष्यामध्ये रायगड सहकारी बँकेच्या माध्यमातून कोळी समाजाला नवीन दिशा मिळू शकेल, बँकेच्या माध्यमातून समाज बांधवांना त्यांच्या व्यवसायासाठी आर्थिक मदत उपलब्ध होऊ शकेल, तसेच समाजाच्या तरुण-तरुणींच्या उत्कर्षासाठी रायगड सहकारी बँकेच्या कार्याचा नक्कीच विस्तार होईल अशी अपेक्षाही दरेकर यांनी व्यक्त केली.
कोळी बांधवाच्या विकासासाठी व आपल्या समाजाला जागरुक ठेवण्यासाठी आम्ही सारे आपल्या पाठीशी आहोत. आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा आशीर्वाद आपल्या समाजाच्या पाठीशी आहे. आम्ही सारेजण महासंघाच्या पाठीशी आहोत. आगामी महानगरपालिका निवडणुकीमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या मागे आपले आशीर्वाद कायम ठेवा, असे आवाहनही दरेकर यांनी यावेळी केले.
यावेळी नगरसेविका राजेश्री शिरवाडकर, दक्षिण मुंबई भाजपा जिल्हा अध्यक्ष राजेश शिरवाडकर, भाजपा मच्छिमार सेलचे अध्यक्ष व आयोजक चेतन पाटील,महिला संयोजक सुनीता माहुलकर,कोकण विभाग संयोजक सचिन पगधरे,महामंत्री नरेंद्र पाटील, मिलिंद म्हात्रे,सरोज माहुलकर,हेमंत कोळी,वितेंद्र मांगेला,राहूल नायक,विकास मंडलिक,मच्छिमार सेलचे जिल्हा संयोजक निकेश वैती,भानुदास वेताळे, भाग्येश भाये, प्रमोद कोळी व रश्मी कोळी आदी मान्यवर उपस्थित होते.
कोळी बांधवाच्या प्रलंबित प्रश्नांना विधीमंडळात न्याय मिळवून देणार -विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर
Date:

