मुंबई, दि. २८ जानेवारी – सत्यमेव जयते! सर्वोच्च न्यायालयाने महाविकास आघाडी सरकारच्या मनमानी कारभाराला, सूडभावनेने घेतलेल्या निर्णयाला चाप लावला आहे. या निर्णयामुळे महाविकास आघाडी सरकारला जबरदस्त सणसणीत अशी चपराक मिळाल्याची प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी दिली.
भाजपच्या १२ आमदारांचे केलेले निलंबन सर्वोच्च न्यायालयाने आज रद्द केले. त्यावर प्रसारमाध्यमांशी बोलताना दरेकर म्हणाले की, लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम हे आघाडी सरकार रोज करतेय. सरकारने तीन-तीन लाख मतदारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदारांचे निलंबन केले होते. आपली सत्ता टिकावी, विरोधकांचे बहुमत होऊ नये, त्यांची संख्या कमी करावी या वाईट उद्देशाने कुठल्याही प्रकारची चूक नसताना, निलंबनासाठी पार्श्वभूमी नसताना हुकुमशाही पद्धतीने १२ आमदारांचे निलंबन करण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयात दाद मागितल्यावर आम्हाला न्याय मिळाला. याबद्दल न्यायदेवतेचे आभार व्यक्त करतानाच दरेकर यांनी कृतज्ञताही व्यक्त केली.
सर्वोच्च न्यायालयाने या निकालाच्या निमित्ताने देशाच्या लोकशाहीच्यादृष्टीने दिशादर्शक भूमिका घेतलेली आहे. सरकार कोणाचेही असू देत, मनमानीपणे अशा प्रकारे कोणालाही निलंबन करता येणार नाही, अशा आशयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलाय. निकाल देताना न्यायालयाने काही गंभीर ताशेरे ओढलेत, तसेच या सरकारच्या भूमिकेवर केलेल्या कारवाईबद्दल आक्षेप सर्वोच्च न्यायालयाने घेतल्याची प्राथमिक माहिती असल्याचेही दरेकर यांनी स्पष्ट केले.
आपले आमदार फुटतील का, विरोधी पक्षाची बहुसंख्या होईल का, अशा प्रकारची भीती महाविकास आघाडी सरकारला होती. १२ आमदारांचे निलंबन करत त्यांची संख्या कमी करावी, असा त्यांचा डाव होता. आता ते निवडणूक घ्यायला काहीतरी करतील, असे वाटते, असेही दरेकर म्हणाले.
त्या १२ आमदारांसाठी तुम्ही आमचे
१२ आमदार निलंबित केले होते का ?
भास्कर जाधव यांच्या विधानावर बोलताना दरेकर यांनी सांगितले की, त्या त्या विषयावर ती ती भूमिका पाहिजे. वड्याचे तेल वांग्यावर काढायचे हे बरोबर नाही. त्या १२ आमदारांसाठी तुम्ही आमचे हे १२ आमदार निलंबित केले होते का, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. सर्वोच्च न्यायालय आपल्या देशातील शेवटची न्यायलयीन संस्था आहे. सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर तो निर्णय स्वीकारला पाहिजे. राज्यपालांचा काही निर्णय असेल तर न्यायालय आहेत, न्यायायलय ठरवेल काय करायचे ते. परंतु ते त्यांनी केले म्हणून तुम्ही हे केले का? सूडभावनाच आहे का तुमच्या मनामध्ये, असा थेट सवालही दरेकर यांनी उपस्थित केला.

