सातारा, दि. १४ फेब्रुवारी – महाविकास आघाडी सरकारला काय चांगले काम केले, ते दाखवता येत नाही. ते पूर्णपणे अपयशी झालेत. म्हणून भावनिक वादविवाद निर्माण करायचे, केंद्र सरकार-राज्य सरकार वाद उभा करायचा, राज्यपाल-राज्य सरकार वाद उभा करायचा, भाजपशी वाद उभा करायचा आणि संघर्षाचे वातावरण उभे करत लोकांचे लक्ष मूळ प्रश्नांपासून विचलित करायचे अशी त्यांची भूमिका आहे, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली.
दरेकर आज सातारा दौऱ्यावर होते. आज सोमवारी विधानसभेचे विरोधी पक्षनेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर कॉँग्रेसने आंदोलन करण्याचा प्रयत्न केला यावर प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, नाना पटोले सांगतात की, मुंबईकरांना त्रास नको म्हणून आंदोलन मागे घेतोय. म्हणजे नाना पटोले यांना आता उपरती झाली का? काल आंदोलन करायचे ठरवले तेव्हा हा विचार आला नाही का की, उद्याच्या आंदोलनाने मुंबईकरांना त्रास होणार आहे. काल आम्हीही भूमिका घेतली की, ठोशास ठोसा देऊ. कोणी चाल करून आले तर आम्ही शांत बसायचे का? अंगावर आले तर शिंगावर घेऊ, हे जेव्हा आम्ही बोललो तेव्हा ते जमिनीवर आले, असेही दरेकर यांनी सांगितले.
अपयश झाकण्यासाठी वाद निर्माण करून लोकांचे लक्ष विचलित करायचे ही आघाडी सरकारची भूमिका – विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर
Date:

