पुणे : दिनांक ८ जुलै २०२२ : कौशल्य विकास प्रशिक्षणात देशात अग्रेसर असलेल्या ‘यशस्वी’ संस्थेचा केंद्रीय कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाच्या पेन्ट्स अँड कोटिंग सेक्टर स्किल कौन्सिल यांच्यासोबत सामंजस्य करार नुकताच संपन्न झाला.
या सामंजस्य करारानुसार ‘यशस्वी’ संस्थेच्या ‘शिका व कमवा’ या योजनेद्वारे किमान 10वी,12वी, आयटीआय, पदवीधर अशी शैक्षणिक पात्रता असलेल्या युवक-युवतींना प्रत्यक्ष कंपनीत ऑन द जॉब ट्रेनिंगची संधी प्राप्त होईल.तसेच औद्योगिक कंपनीच्याच आवारात क्लासरूम ट्रेनिंगच्या माध्यमातून
या विद्यार्थ्यांना नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क (एनएसक्यूएफ)वर आधारित अभ्यासक्रमानुसार
डिप्लोमा चे प्रशिक्षण देण्यात येईल.
विशेष बाब म्हणजे या दोन वर्ष डिप्लोमाच्या प्रशिक्षण कालावधीत प्रत्येक प्रशिक्षणार्थ्याला दरमहा ठराविक रक्कम विद्यावेतन म्हणून देण्यात येणार आहे. (साधारणतः किमान रुपये 10,000/-).
याशिवाय कॅन्टीन व ट्रान्सपोर्ट सुविधा देखील कंपनीतील नियमानुसार देण्यात येईल.
प्रशिक्षण कालावधी पूर्ण झाल्यावर प्रशिक्षणार्थ्यांना केंद्र शासनाच्या पेन्टस अँड कोटिंग सेक्टर स्किल कौन्सिलचे डिप्लोमाचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल.
या प्रशिक्षणामुळे विद्यार्थी रोजगारक्षम होतील,तसेच त्यांना जागतिक दर्जाच्या औद्योगिक आस्थापनांमधील रोजगार संधी मिळण्यास निश्चित मदत होईल, असा विश्वास ‘यशस्वी’ संस्थेचे अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी यांनी व्यक्त केला.

