पुणे: ‘ऑयस्टर अँड पर्ल हॉस्पिटल्स’तर्फे पुण्यातील पहिले मुलांसाठीचे बेडवेटिंग क्लिनिक (अंथरुणात शू करण्याच्या सवयीवर उपचार करणारे शुश्रूषागृह) येथील ‘ओएनपी ट्युलिप हॉस्पिटल’मध्ये आज सुरु करण्यात आले. त्याचे उद्घाटन ‘ऑयस्टर अँड पर्ल हॉस्पिटल्स’च्या पेडियाट्रिक्स अँड निओनॅटॉलॉजी विभागाच्या प्रमुख डॉ. अमिता फडणीस यांच्या हस्ते हॉस्पिटलच्या गोखलेनगर येथील परिसरात करण्यात आले.
हे क्लिनिक अशा स्वरुपाचे पहिलेच असून ते अंथरुणात शू करण्यासंबंधित समस्यांवर उपचारासाठी खास समर्पित आहे. बेडवेटिंग क्लिनिक प्रोग्रॅमअंतर्गत डॉक्टर मुलाची त्याच्या पालकांसमवेत भेट घेतात व अंथरुणात शू करण्याच्या मुलाच्या समस्येबाबत व्यापक पूर्वेतिहास जाणून घेतात त्यानंतर या सवयीच्या प्रकाराचे स्पष्टीकरण करुन उपचारांना सुरवात करतात. उपचारातील प्रगतीवर देखरेख ठेवण्यासाठी सर्वंकष असे नोंद वेळापत्रक पाळले जाते.
या नव्या रुग्णालयाचे व्यवस्थापन डॉ. अमिता फडणीस आणि तज्ज्ञ सहकाऱ्यांचा संघ करत आहे. बेडवेटिंगबाबत माहिती देताना त्या म्हणाल्या, की अंथरुणात शू करण्याची मुलांमधील सवय म्हणजे त्यांच्या स्वच्छताविषयक प्रशिक्षणात कमतरता राहिल्याची घटना नसते. बहुतेकदा हा मुलाच्या विकासातील अगदी साधारणसा भाग असतो. अंथरुणात शू करण्याची समस्या सर्वसामान्य आहे, परंतु जागरुकतेच्या अभावी त्याकडे बहुधा दुर्लक्ष केले जाते किंवा उपचार टाळले जातात. अंथरुणात शू केल्यास मुलांची खरडपट्टी काढणे व त्यांना शिक्षा करणे किंवा त्यांनी शू न केल्यास बक्षीस देणे या दोन्ही गोष्टींना फारसा अर्थ नसतो. त्यापेक्षा मुलांना वेळेवर झोपी जाण्याचे वेळापत्रक पाळण्याची सवय लावणे अथवा शू झाल्यास लगेच स्वच्छता करण्यास शिकवणे महत्त्वाचे ठरते.
भारतात शाळेत जाऊ लागलेल्या सर्व मुलांपैकी अंथरुणात शू करण्याची सवय असणाऱ्यांचे प्रमाण ४ ते १४ टक्क्यांपर्यंत आढळते. आतुरता (अँक्झायटी), नैराश्य (डिप्रेशन) किंवा आत्मविश्वासाचा अभाव अशा मानसिक कारणांत या सवयीचे मूळ दडलेले असते. भावंडे किंवा अन्य नातेवाईक या मुलांची टर उडवतात किंवा खरडपट्टी काढतात. या सवयीमुळे फजिती होईल, या भीतीपोटी कुणा मित्रांच्या अथवा नातेवाईकांच्या घरी मुक्काम करण्याची या मुलांना लाज वाटते.
बेडवेटिंगबाबत अंतर्दृष्टी :
बेडवेटिंग अर्थात अंथरुणात शू करण्याच्या मुलांच्या सवयीला ‘नॉक्टर्नल एन्युरेसिस’ किंवा ‘नाईटटाइम इन्कॉन्टिनेन्स’ असेही म्हटले जाते. मुले गाढ झोपेत असताना लघवीची कमी-अधिक प्रमाणात अनियंत्रित गळती, असे याचे स्वरुप असते.
ही समस्या ५ वर्षे वयाच्या १५ ते २० टक्के मुलांमध्ये आढळते. सातव्या वर्षापर्यंत हे प्रमाण १० टक्क्यांवर, तर नवव्या वर्षापर्यंत तेच ८ टक्क्यांपर्यंत कमी होते, परंतु त्याचा गंभीर परिणाम मुलाचा विकास व वर्तन यावर होऊ शकतो आणि आत्मविश्वासाचा अभाव, सामाजिक अडचणी, विकासात्मक समस्या व अन्य मानसिक समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. अगदी अशा मुलांच्या कुटूंबावरही हे परिणाम घडू शकतात. झोपेत अंथरुण ओले करणे ही मूत्रविषयक समस्या असून ती मुलांमधील अगदी सर्वसामान्य समस्या आहे. जगभरात अशा एन्युरेटिक मुलांची संख्या सुमारे आठ कोटी ते अकरा कोटींच्या आसपास आहे. एन्युरेसिस ही समस्या सामान्यतः पहिल्या अपत्यात, मुलींपेक्षा मुलांमध्ये अधिक, पालकांना त्यांच्या लहानपणी संबंधित समस्या असल्यास किंवा कुटूंबाचा तसा पूर्वेतिहास असल्यास त्यांच्या मुलांत आढळून येते. पालकांतील एकालाही त्याच्या लहानपणी अशीच समस्या असेल तर त्यांचे मूलही अंथरुणात शू करणारे असण्याची शक्यता ४४ टक्के असते. जर दोन्ही पालकांना त्यांच्या लहानपणात ही समस्या असेल तर हीच संभाव्यता ७७ टक्क्यांपर्यंत असते.
मूल किमान पाच वर्षांचे असेल व अंथरुणात शू करण्याची समस्या कमी-अधिक प्रमाणात सातत्याने सुमारे वर्षभर सुरु असेल तरच एन्युरेसिसकडे डिस्ऑर्डर म्हणून पाहिले जाते. जन्म झाल्यापासून मूल सातत्याने अंथरुण ओले करत असेल तर तो प्राथमिक एन्युरेसिस असतो. जर मूल सहा महिन्यांहून अधिक काळपर्यंत अंथरुणात शू न करता कोरडे राहिले आणि नंतर एन्युरेसिस पुन्हा उद्भवला तर तो दुय्यम एन्युरेसिस समजला जातो.
मुलांनी अंथरुणात शू करण्याच्या समस्येला किरकोळ समजून दुर्लक्ष करु नये, असे सांगताना डॉ. अमिता फडणीस म्हणाल्या, की केवळ मुलांचे ओले पायजमे व ओल्या बेडशीट बदलून चालत नाही, तर ही समस्या सहानुभूतीपूर्वक हाताळावी लागते, कारण त्याचा दुष्परिणाम त्या मुलाच्या आत्मविश्वासावर होत असतो. झोपेत अंथरुण ओले करण्यामागे विविध मूत्रविषयक समस्या असल्या तरी त्यात गंभीर स्वरुपाची समस्या क्वचितच आढळते. आम्हाला असे आढळले आहे, की केवळ एक ते चार टक्के मुलांना ही समस्या मूत्रमार्गाच्या अन्य अनियमिततेमुळे येत असते. अंथरुण ओले करण्याच्या सवयीमुळे मुलांमध्ये काही मानसिक समस्या उद्भवू शकतात, परंतु एन्युरेसिसग्रस्त सर्व मुले ही मानसिकदृष्ट्या व्यवस्थित असतात. यशस्वी उपचार केलेल्या मुलांमध्ये टप्प्याटप्प्याने आणि सकारात्मक बदल घडताना दिसून येतो. त्यामुळे अनेक मुलांना या उपचारांची गरज आहे आणि यशाचे प्रमाणही चांगले आहे. अशी मुले व त्यांचे पालक यांच्यासाठी हा अनुभव दिलासादायक असतो. पालकांनी जागरुकता व संयम दाखवून अशा मुलांवर उपचार करुन घेण्याची गरज आहे. ऑयस्टर अँड पर्ल हॉस्पिटल्स त्यांना मदतीसाठी सज्ज आहे.
पालकांनी बेडवेटिंग क्लिनिकबाबतच्या अधिक माहितीसाठी कृपया ‘ऑयस्टर अँड पर्ल हॉस्पिटल्स’च्या http://onphospital.com/ या संकेतस्थळावर लॉग ऑन करावे अथवा बेडवेटिंगबाबत सविस्तर माहितीसाठी http://drydawn.com हे संकेतस्थळ पाहावे.
‘ऑयस्टर अँड पर्ल हॉस्पिटल्स’विषयी :
आरोग्यसुरक्षा क्षेत्रात ५५ वर्षांची परंपरा असलेल्या ‘ऑयस्टर अँड पर्ल हॉस्पिटल्स’चे नेतृत्व डॉ. अविनाश फडणीस (एमडी) व पेडियाट्रिक्स अँड निओनॅटॉलॉजी विभागाच्या प्रमुख डॉ. अमिता फडणीस करत आहेत. हे पुण्यातील सर्वोत्तम मल्टी-स्पेशॅलिटी हॉस्पिटल्सपैकी असून ‘ओएनपी ट्युलिप हॉस्पिटल’ (महिला व लहान मुलांसाठीचे रुग्णालय) त्याच्याच छत्राखाली कार्य़रत आहे.
येथील डॉक्टर, परिचारिका व सहकारी कर्मचाऱ्यांचा संघ लोकांना अत्युत्कृष्ट दजार्ची शुश्रूषा व उपचार देण्यासाठी सज्ज आहे.

