पंढरपूर, दि.१२ जुलैः“आज जगाची अवस्था भस्मा सुरासारखी झालेली आहे. यातून मानव जातीला वारकरी संप्रदाय वाचवू शकेल. पुणे येथे संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराज यांचा नावाने उभारण्यात आलेल्या जगातील सर्वात मोठ्या घुमटातून या संप्रदायाचा संदेश जगभर पोहचत आहे. वारकरी संप्रदायच जगाला सुख, समाधान व शांतीचा मार्ग दाखवेल.”असे विचार विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटीचे संस्थापक-अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी व्यक्त केले.
‘संत श्रीपाद बाबा’ व ‘संत रामदास बाबा’ पालखी सोहळा यांच्या वतीने आयोजित जीवन गौरव पुरस्कार प्रदान कार्यक्रमात ते बोलत होते.
शहरी वस्तीतील मंडळींना भक्ती रसाची गोडी लागण्यासाठी आनंद संप्रदायाची मुहूर्तमेढ रोवली. त्यामाध्यमातून उत्कृष्ट आध्यात्मिक कार्य केल्याबद्दल आनंदभुषण गुरुवर्य ह.भ.प. गोविंद बाबा गाडगे व ह.भ.प. वै. ज्ञानेश्वर बाबा झणझणे यांना डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. ह.भ.प. वै. ज्ञानेश्वर बाबा झणझणे यांच्यावतीने त्यांच्या पत्नी शांताबाई झणझणे यांनी पुरस्काराचा स्विकारा केला. २५ हजार रूपये रोख, मानपत्र, शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह पुरस्काराचे स्वरूप होते.
कार्यक्रमात प्रमुख पाहुणे ह.भ.प. तुळशीराम दा. कराड, बाळासाहेब महाराज चव्हाण, जगताप गुरूजी, एमआयटी डब्ल्यूपीयूचे प्र कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे, नंदकुमार गोते, डीवायएसपी रमेश वेठेकर व ह.भ.प. बाबासाहेब चव्हाण उपस्थित होते.
या प्रसंगी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी या पालखी सोहळ्याच्या निर्मिती कार्यास सव्वा लाख रुपये देण्याची घोषणा केली. तसेच ह.भ.प गोविंद बाबा गाडगे यांनी पुरस्काराची राशी संस्थेच्या कार्यास दिली.
प्रा.डॉ.विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“ महिलांच्या त्याग व समर्पणामुळे भारताचे नाव जगभरात पोहचले आहे. स्वामी विवेकानंद म्हणायचे, दोन्ही हाथ घेण्याकरीता नाहीत, तर देण्याकरीता असतात. या तत्वांचे पालन करून दोन्ही पुरस्कारार्थी वारकरी संप्रदायासाठी आपल्या श्रीमंती बरोबरच नम्रता, समर्पण आणि त्याग केला आहे. सत्य संकल्प असल्याशिवाय कोणतेही कार्य सिद्धीस जात नाही. पुर्णब्र्ह्मयोगिनी त्यागमुर्ती प्रयागअक्का कराड यांच्या संकल्पनेमुळेच आज बद्रीनाथ येथील माणा गावात माता सरस्वतीचे मंदिर उभे राहिले. तसेच आळंदी, देहू आणि रामेश्वर (रूई) येथील कार्य पूर्णत्वास गेले. मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण या तत्वाचे पालन केल्यास संपूर्ण मानव जाती सुखी होईल.”
पुरस्काराला उत्तर देतांना ह.भ.प. गोविंद बाबा गाडगे म्हणाले,“प्रेम, तप, जिव्हाळा यातून वारकरी सेवेचे कार्य केले आहे. सेवेमुळे माझ्या जीवनाचा संपूर्ण कायापालट झालेला आहे.”
याप्रसंगी जगताप गुरूजी व ह.भ.प. लोखंडे महाराज यांनी आपले विचार मांडले. तसेच डॉ. मिलिंद पांडे यांनी मानपत्राचे वाचन केले.
प्रास्ताविकेत ह.भ.प. रामचंद्र इंगोले महाराज म्हणाले,“३६ वारकर्यांपासून सुरू झालेल्या या पालखीत आता २५०० हजार वारकरी सहभागी झालेले आहेत. तसेच श्री गोते यांनी १० लाख रूपये देऊन चांदीचा पालखी रथ दिलेला आहे.”
या प्रसंगी राजेंद्र रणभोर यांनी गुरूवंदना गायली.
ह.भ.प. शालिग्राम खंदारे यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.
वारकरी संप्रदायच मानव जातीला वाचवेल-प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड
Date:

