पुणे-भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी सांगीतले आहे की, गेल्या ६ वर्षांमध्ये म्हणजेच २०१४ साली नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून देशातील शेतकरी सुखी, समाधानी आणि सुरक्षित व्हावा यासाठी त्यांनी अनेक योजना राबविल्या. या देशामध्ये शेतकऱ्यांचं दुखणं ओळखलं ते फक्त मोदींजींनी. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मुळशी तालुकाच्या भूगाव येथे आज भव्य शेतकरी मेळावा पार पडला. यावेळी खासदार गिरीश बापट, माजी मंत्री बाळा भेगडे, प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी आदी वरिष्ठ नेते मंडळी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रधानमंत्री किसान सम्मान योजनेअंतर्गत देशाच्या 9 कोटी शेतकऱ्यांनां 18 हजार कोटी रुपये वाटप करण्यासंबंधातील कार्यक्रमच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा आयोजित करण्यात आला होता.
यावेळेस भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी केंद्र सरकारच्या नवीन कृषी कायद्यांची माहीती देत त्याचे महत्व पटवून दिले. पाटील म्हणाले , देशात कृषी कायद्याविरोधात कुठलीही नाराजी नाही. कारण दिल्ली वगळता देशभरात मध्यप्रदेश,कर्नाटक, राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेश, तेलंगणा आंध्र प्रदेश अशा कुठल्याही ठिकाणी शेतकरी आंदोलन करण्यात आलेले नाही. महाराष्ट्रातही काँग्रेसने शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरवण्याचा प्रयत्न केला मात्र, त्यांचे कार्यकर्ते वगळता कोणीही रस्त्यावर उतरले नाहीत. देशभरातील शेतकरी कधीच रस्त्यावर उतरला नव्हता आणि आता देखील तो या कायद्याविरोधात उतरणार नाही असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.
पंजाबमधील शेतकऱ्यांचा गैरसमज केला जातोय. दिल्लीतील आंदोलनापाठीमागे राजकीय स्वार्थ दडलेला आहे हे ज्यांच्या लक्षात आले आहे ते आता तिथून पळ काढत आहेत हे देखील पाटील यांनी नमूद केले.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले की, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खताचा भ्रष्टाचार थांबावा,पाण्याची व्यवस्था व्हावी,पिक विमा मिळावा तसेच साखरेचे उत्पादन वाढल्यामुळे शेतकरी इथेनॉलकडे वळावा यासाठी भांडवल दिले. शेतकऱ्यांना चांगला भाव मिळावा यासाठी हे कायदे केले. देशातील मूठभर शेतकरी कृषी कायद्याविरोधात रस्त्यावर उतरत आहेत, जर सर्व शेतकऱ्यांना कृषी कायदा अन्यायकारक वाटला असता तर देशभर आंदोलन झाले असते. परंतु, दिल्लीच्या सीमेवरील शेतकरीआंदोलन हे पूर्वग्रहदूषित आणि राजकीय हेतूने करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चर्चा करा असे अनेकदा म्हणत आहेत.
कांग्रेसच्या दुटप्पीपणाच्या संस्कृतीवर प्रहार करताना चंद्रकांत पाटील यांनी सांगीतले की, दुटप्पीपणा हा काँग्रेसचा पहिल्यापासूनच स्थायीभाव आहे. शेतकरी, मराठा आरक्षण, ओबीसी, धनगर आरक्षणासह विविध मुद्द्यांवर काँग्रेसचे नेते हे ठरवून वेगवेगळे भाष्य करत गैरसमज निर्माण करण्याचे काम करत आहेत. हा तर त्यांचा धंदाच आहे, अशी टीका देखील पाटील यांनी यावेळी केली.

