एमआयटी डब्ल्यूपीयूत अर्थ शास्त्र -२०२२
पुणे, ७ जून : “काळी माती आपली आई आहे. तिचा र्हास होत आहे. ती टिकविण्यासाठी रासायनिक खताचा वापर कमी करून जुन्या पध्दतीचे बीज वापरून विषमुक्त अन्नधान्य पिकविले तर सुदृढ पिढी घडू शकेल. प्रत्येकाने देशी गाय आपल्या घरात आणावी. विकासाच्या नावाखाली होणारी जंगलतोड थांबवून निसर्गाने दिलेलं देणं जतन करावे.” असे प्रतिपादन अहमदनगर जिल्ह्यातील कोंभाळणे येथील बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हसिटीच्या स्कूल ऑफ सस्टनेबलिटीस्टडिज व निनॉक्स नेचर क्लब यांच्यातर्फे जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून अर्थ-शास्त्र २०२२ ( Earth Shastra 2022 ) या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड हे होते. टेर पॉलिसी सेंटरचे संचालक डॉ. राजेंद्र शेंडे, अॅग्रो टुरिझमचे प्रणेते पांडुरंग तावरे आणि बांबू उत्पादक व संशोधक संजिव करपे हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, प्र कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे, फॅकल्टी ऑफ सस्टनेबलिटी स्टडिजच्या संचालिका डॉ. अनामिका बिस्वास व सहयोगी प्राध्यापक डॉ.पंकज कोपर्डे व डॉ. प्रसाद कुलकर्णी हे उपस्थित होते.
श्रीमती राहीबाई पोपेरे म्हणाल्या, “मी कुठलेही शिक्षण घेतलेले नाही. मी एक ऊसतोड कामगारच होते.परंतू माझे वडिल आणि निसर्ग यांनीच मला शिकविले. आज शेतीमध्ये सेंद्रिय खते आणि हायब्रिड अशा अन्नधान्य व भाजीपाला पिकविला जात आहे. त्यामुळे मानवी जीवनावर त्याचा विपरित परिणाम होत आहे. त्यामुळे अनेक लोक आजारी पडत आहे. आणि नवीन पिढीसुध्दा याला अपवाद नाही. त्याकरिता पारंपारिक वाण वापरून उत्पादन केल्यास जमीनीचा र्हासपण कमी होईल आणि दर्जेदार उत्पादन होऊन सुदृढ अशी नवीन पिढी घडेल . ”
श्री.राजेंद्र शेंडे म्हणाले, “पूर्वीच्या काळी शेती पारंपारिक पध्दतीने करून चांगल्या प्रतिचे उत्पादन केले जात होते. सेंद्रीय खताचा वापर करून जमीनीचा कस वाढविला जात होता. एकमेकांना उपयोगी पडेल अशा पध्दतीने काम करत तोच शाश्वत विकासाचा पाया होता. भविष्यात शाश्वत विकासाशिवाय पर्याय नाही. प्रत्येकाने शिका, त्यावर काम करा आणि उच्चदर्जाची निर्मिती केली तरच भारत आत्मनिर्भर बनेल.”
श्री.संजिव करपे म्हणाले, ‘ आज बांबू शेतीला चांगले दिवस आले आहेत. यातून शेतकर्यांचे उत्पादन वाढले आहेच व इतर लोकांनाही मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध झालेला आहे. आता या बांबूचा उपयोग फर्निचर, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन, सायकली, कपडे, बोर्ड, चप्पल, सीट कव्हर, बांबूची घरे बनविले जात आहेत.”
श्री.पांडुरंग तावरे म्हणाले, “शेतीला पर्यटनाची जोड दिल्यामुळे शेतकर्यांचा शाश्वत विकास होईल. खेडेगावाची संस्कृती परंपरा ही या पर्यटनाच्या माध्यमातून माहित होऊन तेथील शेतीमध्ये उत्पादित झालेल्या मालाची विक्री यातून त्यांना रोजगार मिळू शकेल. आणि गावाचा विकास होईल. गाव आत्मनिर्भर बनेल.”
प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले, “शेती, कृषी पर्यटन आणि बांबूची शेती यावर ग्रामीण भागातील शेतकर्यांनी विशेष लक्ष दिले पाहिजे. शेतकरी समृध्द झाला, की समाज समृद्ध होईल. त्यातून देशाचा विकास होईल. प्रत्येकाने निसर्ग तत्त्वाचे पालन केल्याने विकासाबरोबरच समाजात सुख, समाधान आणि शांती नांदेल.”
यावेळी मनोज अनपट, अनपटवाडी, शांताबाई वरवे, तिकोना पेठ, किशोर फडतरे, निंबोडी व वैशालीताई, वडगाव, जुन्नर या सरपंचांचा सत्कार करण्यात आला.
डॉ. पंकज कोपर्डे यांनी प्रास्ताविक केले. निधी धामणे यांनी सूत्रसंचालन केले.
डॉ. अनामिका बिस्वास यांनी आभार मानले.

