पुणे- सत्ता असलेल्या भाजप पदाधिकाऱ्यांचे महापालिका प्रशासनावर कोणतेही वर्चस्व अगर लक्ष न राहिल्यानेच पालिकेचा तुघलकी कारभार सुरु असल्याचे पुणे महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या दीपाली प्रदीप धुमाळ यांनी म्हटले आहे. हे सर्व पदाधिकारी टेंडर रिंगा करण्यात व्यस्त असल्याने महापालिकेचे अधिकारीही भ्रष्टाचार प्रकरणी सापडू लागलेत तसेच काही अधिकारी लोकांकडून वसुलीचे आदेश काढण्याचे टार्गेट देत असल्याचे धुमाळ यांनी म्हटले आहे.
सौ. धुमाळ म्हणाल्या कि,’ कोरोना काळात सर्वच व्यावसायिकांचे उत्पन्न कमी झाले आहे. पथारी व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. गोरगरिबांना जगण्याची भ्रांत असताना दैनंदिन 10 लाख रुपयांचा दंड सक्तवसुलीचे आदेश काढणे कितपत योग्य आहे.महापालिकेचे उत्पन्न वाढवायचे असेल तर मिळकतकर वसूल करण्यावर भर दिला पाहिजे. तसेच ज्या मिळकतीवर टॅक्स लावला नाही, त्या शोधून टॅक्स लावला पाहिजे. खर्चात बचत म्हणजे देखील उत्पन्न असते. कोट्यवधीचे टेंडर रिंग न करता प्रामाणिकपणे कसे होतील यावर जरी भर दिला तरी करोडो रुपये वाचणार आहेत.कामे न करता बिले देणे यावर लक्ष दिले पाहिजे. पण सत्ताधारी यांच्या दबावाने मोठे घोटाळे करायचे आणि मग गोरगरिबांना नाहक त्रास द्यायचा असला तुघलकी कारभार बंद करा. अन्यथा पुणेकर येत्या निवडणुकीत नक्कीच धडा शिकवतील, असा इशारा धुमाळ यांनी दिला आहे.