पुणे जिल्ह्यात १ लाख ६४ हजार शेतकऱ्यांनी घेतला लाभ
पुणे, दि. २१ मार्च २०२२: कृषिपंपाच्या वीजबिलांतून थकबाकीमुक्त होण्यासाठी राज्याचे ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांच्या संकल्पनेतील कृषिपंप वीजजोडणी धोरण २०२० मधून मूळ थकबाकीमध्ये सुमारे ६६ टक्के सवलत देण्यात येत आहे. त्यातील ५० टक्के सवलतीचा लाभ घेण्यासाठीची मुदत येत्या ३१ मार्चपर्यंत आहे. पुणे जिल्ह्यातील १ लाख ६४ हजार २२० शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग घेतला असून त्यातील ४३ हजार ३७८ शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेत वीजबिल कोरे केले आहे.
दरम्यान, पुढील तीन महिन्यांमध्ये थकबाकीमुळे कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येणार नाही. तथापि, या योजनेचा लाभ घेण्यासाठी केवळ १० दिवस शिल्लक आहे. त्यामुळे योजनेत सहभागी होणाऱ्या थकबाकीदार शेतकऱ्यांना महावितरणकडून वीजबिलांच्या तात्काळ दुरुस्तीसह सर्व प्रकारचे कार्यालयीन सहकार्य जलदगतीने देण्यात येत आहे. सुधारित थकबाकीच्या रकमेत ५० टक्के सवलत मिळविण्यासाठी दि. ३१ मार्चपूर्वी थकबाकीमुक्ती योजनेत सहभागी व्हावे. चालू वीजबिल व थकबाकीची ५० टक्के रक्कम भरून वीजबिल कोरे करावे तसेच कृषी आकस्मिक निधीमधून ग्रामपंचायत क्षेत्र व जिल्हाक्षेत्रातील वीजयंत्रणेच्या विकास कामांना हातभार लावावा असे आवाहन पुणे प्रादेशिक संचालक (प्र.) श्री. अंकुश नाळे यांनी केले आहे.
पुणे जिल्ह्यातील ३ लाख १४ हजार ११४ शेतकऱ्यांकडे एकूण ३१०१ कोटी ६२ लाख रुपयांची एकूण थकबाकी होती. त्यातील महावितरणकडून निर्लेखन तसेच व्याज व दंड माफी आणि वीजबिल दुरुस्तीनंतर समायोजनेतून या शेतकऱ्यांकडे आता २३१० कोटी ७६ लाख रुपयांची सुधारित थकबाकी आहे. त्यातील ५० टक्के रक्कम येत्या दि. ३१ मार्च २०२२पर्यंत भरल्यास उर्वरित ५० टक्के थकबाकी म्हणजे ११५५ कोटी ३८ लाख रुपये माफ होणार आहे व वीजबिल देखील संपूर्ण कोरे होणार आहे.
आतापर्यंत १ लाख ६४ हजार २२० शेतकऱ्यांनी थकबाकीमुक्त योजनेत सहभाग नोंदविला आहे. यामध्ये त्यांनी थकबाकी व चालू वीजबिलांपोटी ३३७ कोटी ५७ लाख रुपयांचा भरणा केला आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना थकबाकीपोटी भरलेल्या रकमेएवढी सूट, महावितरणकडून निर्लेखनद्वारे मिळालेली सूट तसेच विलंब आकार व व्याजातील सूट अशी एकूण ४४० कोटी ५१ लाख रुपये माफ झाले आहेत. यामध्ये ४३ हजार ३७८ शेतकरी वीजबिलांमधून संपूर्णपणे थकबाकीमुक्त झाले आहेत. त्यांनी चालू वीजबिलासह सुधारित थकबाकीची ५० टक्के रक्कम असा एकूण १३० कोटी रुपयांचा भरणा केला आहे. त्यामुळे सुधारित थकबाकीमध्ये त्यांना आणखी ८६ कोटी १८ लाख रुपयांची सूट व संपूर्ण थकबाकीमुक्ती मिळाली आहे.
कृषिपंपाच्या थकीत व चालू वीजबिलांच्या भरण्यामधून पुणे जिल्ह्याच्या ग्रामपंचायत व जिल्हा क्षेत्रासाठी प्रत्येकी १३० कोटी २२ लाख असे एकूण २६० कोटी ४४ लाख रुपये कृषी आकस्मिक निधीमध्ये जमा झाले आहेत. या निधीमधून वीजयंत्रणेच्या विस्तारीकरण व सक्षमीकरणाचे कामे करण्यात येत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ७ नवीन उपकेंद्र व ७ उपकेंद्राची क्षमतावाढ या निधीमधून प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यातील ७ नवीन उपकेंद्र व ४ उपकेंद्राच्या क्षमतावाढीचे प्रस्ताव मंजूर झाले आहेत. यासह जिल्ह्यात १०१ कोटी ४६ लाख रुपये खर्चाच्या १७९९ विविध कामांचे अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले आहे. कृषी आकस्मिक निधीमधून आतापर्यंत ४८ कोटी ३१ लाख रुपये खर्चाचे १६२५ कामे सुरु करण्यासाठी कामाचा आदेश देण्यात आला आहे. त्यातील १२७९ कामे प्रगतीपथावर आहे तर ३४६ विविध कामे पूर्ण झाली आहेत.

