पुणे
करिअरचा विचार करताना नोकरीमागे धावण्यापेक्षा नवउद्योजक बनत स्वतःचा व्यवसाय सुरू करा आणि सर्जनशील संकल्पनांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत रोजच्या जगण्यातील समस्यांवर उत्तर शोधा, असा मोलाचा सल्ला ‘पर्सिस्टंट सिस्टिम्स’चे संस्थापक-अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. आनंद देशपांडे यांनी युवा पिढीला दिला.
प्रसिद्ध संगणकतज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूरलिखित ‘मेनका प्रकाशन’च्या ‘ऑनलाईन स्टार्ट अप – ई व्यवसायाचा रोडमॅप’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. देशपांडे यांच्या हस्ते सोमवारी (दि. १ ऑगस्ट) पार पडले. त्या वेळी ते बोलत होते. कन्नड संघाच्या कावेरी कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चरचे (एमसीसीआयए) महासंचालक डॉ. अनंत सरदेशमुख, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे (मसाप) कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कन्नड संघ पुणेच्या सचिव मालती कलमाडी, प्रकाशक आनंद आगाशे आणि कावेरी कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. बी. खरोसेकर यावेळी उपस्थित होते.
केंद्र सरकारतर्फे ‘स्टार्ट अप इंडिया’, ‘मेक इन इंडिया’अशा व्यवसायाभिमुख योजना राबविण्यात येत असताना अधिकाधिक तरुणांना ई-उद्योजकतेचे धडे गिरविण्यासाठी मार्गदर्शन मिळावे या उद्देशानेच डॉ. शिकारपूर यांनी हे पुस्तक लिहिले आहे. डॉ. देशपांडे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्यासाठी प्रोत्साहन देत व्यवसाय सुरू करण्यासंबंधी त्यांच्या मनात असलेल्या शंकाचे निरसन केले.
‘‘स्टार्ट अप सुरू करण्यामागे निव्वळ पैसा कमावणे ही कोणत्याही आंत्रप्रिन्युअरची भूमिका नसते. सर्जनशील संकल्पनांना वास्तवात उतरवण्यासाठीचे व्यासपीठ म्हणून तो आपल्या व्यवसायाकडे बघत असतो. त्यामुळे व्यवसाय सुरू करताना केवळ भांडवल, गुंतवणूक यांकडे बघण्यापेक्षा आजवर कोणीच विचार केला नाही, अशा समस्यांचा शोध घ्या आणि त्यांची सोडवणूक करताना त्यांचे मागणीत रूपांतर करत आपले बिझनेस मॉडेल यशस्वी करा,’’ असे डॉ. देशपांडे यांनी सांगितले.
डॉ. शिकारपूर म्हणाले, ‘‘मराठी माणूस व्यवसायात आणि ई-व्यवसायात मागे राहू नये, हा एकमेव उद्देशानेच हे पुस्तक आकाराला आले. ऑनलाईन क्षेत्रात दडलेल्या व्यावसायिक संधी शोधून स्वतःची स्टार्ट अप कंपनी सुरू करण्यापर्यंतच्या प्रवासातील ठळक टप्प्यांची सविस्तर माहिती या पुस्तकात दिलेली आहे.’’
‘‘सचोटी, हातोटी आणि कसोटी या अंगभूत गुणांना सर्जनशिलता, प्रयोगशिलता आणि कृतीशिलतेची जोड मिळते तेव्हा एक उत्तम उद्योजक घडतो. आपल्या शिक्षणव्यवस्थेत उद्योजकतेविषयी कमालीची अनास्था असून, हा दृष्टीकोन बदलणे आवश्यक आहे. वेगवेगळ्या माहितीपूर्ण विषयांमधील साहित्यनिर्मितीला प्रोत्साहन देण्याची भूमिका महाराष्ट्र साहित्य परिषदेने आता घेतली आहे,’’ असे प्रा. मिलिंद जोशी म्हणाले.
नवउद्योजकांना संगणकीकरणातील अद्ययावत प्रवाहांची ओळख करून देणारे हे माहितीपूर्ण पुस्तक असल्याचे डॉ. सरदेशमुख म्हणाले. आनंद आगाशे यांनी पुस्तकनिर्मितीमागची भूमिका स्पष्ट केली. मालती कलमाडी यांनी प्रास्ताविक केले. महाविद्यालयाच्या इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. मुक्ता करमरकर सूत्रसंचालन केले; तर प्राचार्य डॉ. एस. बी. खरोसेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

