पुणे-अखिल सदाशिव, शनिवार, नारायणपेठ आंबेडकर जयंती महोत्सव समिती तर्फे “ऑनलाईन आंबेडकर जयंती” चे आयोजन करण्यात आले असून अनेक मान्यवरांसोबतच्या संवादा बरोबरच ऑनलाईन स्पर्धांचा यात समावेश आहे. अशी माहिती सामाजिक आणि सांकृतिक क्षेत्रातील कार्यकर्ते वैभव वाघ यांनी येथे दिली .
ते म्हणाले,’ राष्ट्रपुरुष आपल्या हक्काचे नाही कोणत्या जातीचे’ हा संदेश देत अखिल सदाशिव, शनिवार, नारायणपेठ आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या वतीने दरवर्षी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. या वर्षी कोरोना विरूध्दच्या लढाईच्या पार्श्वभूमीवर समितीच्या वतीने “ऑनलाईन आंबेडकर जयंती” चे आयोजन करण्यात आले आहे.
दिनांक १३ व १४ एप्रिल रोजी Online Ambedkar Jayanti या फेसबुकपेज च्या माध्यमातून राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे, सिनेअभिनेते चिन्मय मांडलेकर, दिग्दर्शक परेश मोकाशी, दिग्दर्शक प्रविण तरडे, दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर, इतिहास अभ्यासक मोहन शेटे , उद्योजक मिलिंद कांबळे हे मान्यवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर या विषयावर सोशल मिडीयाच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत.
त्याचबरोबर समितीतर्फे “गो कोरोना चषक” या ऑनलाईन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यात ऑनलाईन चित्रकला स्पर्धा व समुह नृत्य स्पर्धा यांचा समावेश आहे. पण या या स्पर्धांमध्ये पूर्ण कुटुंब एक टीम म्हणून सहभागी होणे अपेक्षित आहे. या ऑनलाईन महोत्सवाची व स्पर्धांची माहिती Online Ambedkar Jayanti या फेसबुक पेजवर उपलब्ध आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या ऑनलाईन डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन आयोजन समितीच्या वतीने वैभव वाघ यांनी केले आहे.
वंदेमातरम् संघटना सोशल मिडीया विभाग, मायमराठी डॉट नेट, पुण्याचा सरपंच फेसबुकपेज, इनमराठी फेसबुकपेज, हे या महोत्सवाचे सहआयोजक आहेत.

