पुणे- घरापासून मेट्रो पर्यंत आणि मेट्रो पासून इच्छित स्थळापर्यंत ,पुन्हा घरापर्यंत सायकल योजना राबविणाऱ्या योजनेच्या बातमीने पीएमपीएमएल कर्मचारी आणि रिक्षा चालकांत एकच चर्चा उसळली आहे . कोणा एका ठेकेदाराचे उखळ पांढरे करण्यासाठी चाललेले हे उद्योग जनतेचे पुन्हा पुन्हा पैसे बरबाद करतील पण पीएमपीएमएल, रिक्षा अशा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला पार्याय देऊ शकणार नाहीत असा हि दावा या वर्गातूनच होतो आहे .
रिक्षा चालकांचे म्हणणे आहे मेट्रो आल्याने पुण्यातील वाहतूक समस्या मिटेल हा एक भ्रम आहे. मुंबईत मेट्रो आली , दिल्लीतही आली तेथील वाहतूक समस्या मिटली काय ? पुण्यात सर्व वयाचे प्रवासी आम्हाला मिळतात . ते सर्वच सायकली चालवू शकणार नाहीत . पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांनी तर याबाबत हे भ्रष्टाचारी कारस्थान असल्याचे म्हटले आहे. घरापर्यंत म्हणजे सायकली प्रवासी घरी नेणार काय ? ऑफिसात लावणार काय ? सायकली पार्क करायला मेट्रो स्टेशन जवळ जागा कराल पण त्या तिथेच धूळ खात पडतील मोडक्या तोडक्या अवस्थेत दिसतील . या पूर्वीही अनेकदा पुण्यात सायकली पुन्हा आणण्याचे प्रयत्न झाले पण ते सर्व अयशस्वी झाले . सरकारकडे पगाराला पैसे नसतील असे सांगून एस टी कर्मचाऱ्यांना न्याय नाही तसा इथे हि महापालिकेकडे पैसे नसतील असे सांगून पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांना न्याय नाही, इथेही कर्मचारी थेट भरती न करता त्यांना कायम सेवेच्या सुविधा न देता ठेकेदारी पद्धतीवर कामगार राबवून घ्यायचे आणि अशा योजनांवर करोडो उधळून खाऊन मोकळे व्हयाचे हे प्रकार आता लपून राहिलेले नाहीत . हे देखावे आहेत .
आमच्या कष्टांना अंत नाही आणि अशा भ्रष्टाचारांना देखील थांबा नाही पण टांगा पुन्हा शहरात येणार आहे काय ? असाही मार्मिक सवाल सार्वजनिक वाहतूक सेवेतील या दोन्ही व्यवस्थेतील कर्मचाऱ्यांनी विचारला आहे.

