या घटनेनंतर ओवेसी म्हणाले की, मी सुरक्षित आहे.
गाझियाबाद -उत्तर प्रदेशमध्ये AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्या ताफ्यावर गोळीबार करण्यात आला आहे. हापूर जिल्ह्यातील पिलखुवा येथून सभा आटोपून ते गाझियाबादला परतत होते. गाझियाबादमधील छीजारसी टोल प्लाझाजवळ त्यांच्या ताफ्यावर पाच गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. त्यांच्या गाडीवर गोळ्यांच्या खुणा स्पष्ट दिसत आहेत.
दरम्यान, या प्रकरणात वापरलेली शस्त्र सापडली असून एका आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.आज मेरठच्या किथौध भागातून दिल्लीला जात असतानाकाही जणांनी त्यांच्या ताफ्यावर गोळ्या झाडल्या.
एएनआयशी बोलताना ओवेसी म्हणाले, “मी किथौध, मेरठ येथील एका मतदान कार्यक्रमानंतर दिल्लीला निघालो होतो. छाजरसी टोल प्लाझाजवळ दोन लोकांनी माझ्या वाहनावर सुमारे तीन ते चार गोळ्या झाडल्या. ते एकूण ३-४ लोक होते. माझ्या वाहनाचे टायर पंक्चर झाले, त्यानंतर मी तेथून दुसऱ्या वाहनाने निघालो,” असं त्यांनी सांगितलं.
“या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करावी. या घटनेमागे कुणाचा हात होता, याचा तपास करावा. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि मोदी सरकारने याची चौकशी करावी. एका खासदारावर उघडपणे गोळीबार होणं, कसं शक्य होते आहे,” असा सवाल ओवेसी यांनी केला.

