राष्ट्रवादी म्हणजे डबल ढोलकी – या घाणेरड्या राजकारणाला पुणेकर थारा देणार नाही
पुणे : मेट्रो निवडणुकीपूर्वी सुरुहोईल आणि भाजपला त्याचे श्रेय मिळेल म्हणून तिळपापड होऊ पाहणाऱ्या राष्ट्रवादी , आणि कॉंग्रेस शिवसेनेची नगरसेवक मंडळी काही गणेश मंडळाचे कार्यकर्ते हाताशी धरून दिशाभूल करणारी नाटकी आंदोलने करत असल्याचा आरोप महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केला आहे .अजित पवार हे त्यांचेच नेते आहेत त्यांनी पोलीस बंदोबस्तात संभाजी पुलावरील मेट्रोच्या पुलाचे काम सुरु ठेवा असे आदेश दिलेले आहेत . असे असताना ते काम थांबवा , त्या मेट्रोच्या पुलामुळे विसर्जन मिरवणुकीला अडथळा निर्माण होणार आहे असे सांगत ज्येष्ठ नगरसेवक आबा बागुल, दिपाली धुमाळ ,प्रशांत जगताप ,वसंत मोरे , साईनाथ बाबर ,पृथ्वीराज सुतार आदी नगरसेवक मंडळींनी सभागृहात गोंधळ घालीत कामकाज होऊ दिलेले नाही हे योग्य नाही त्यांच्या मुले ३०० विषयांवर निर्णय होऊ शकला नाही असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी म्हटले आहे .
यावेळी मोहोळ म्हणाले, ”अजित पवारांनी पोलीस देखरेखीत पुणे मेट्रोचं काम सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. या बाबतीत स्पष्ट उल्लेख मेट्रोनं पुणे महापालिकेला दिलेल्या पत्रात केला आहे. जेव्हा संभाजी पुलावरचं मेट्रोचं काम थांबवण्यात आलं त्यानंतर या कामावर आक्षेप घेणाऱ्या शहरातील गणेश मंडळांसोबत महापालिका प्रशासनाची बैठक झाली. गणपती मिरवणूक या पुलावरुन जाताना मेट्रोमुळे अडचण येईल म्हणून हे काम रोखण्यात आलं होतं. मात्र मेट्रोचं काम सुरु राहील, असं या बैठकीत ठरलं. तेव्हा गणेश मंडळं या निर्णयावर तयारही झाली होती. तरीही मेट्रोचं काम सुरु होऊ नये म्हणून गणेश मंडळ कार्यकर्त्यांनी पुलावर जाऊन आंदोलनं केलीत. ज्यानंतर गणेश मंडळांनी मेट्रो कामाबाबतीत सुचवलेले पर्याय आणि मेट्रोची बाजू जाणून घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मेट्रो पदाधिकाऱ्यांशी बैठकीत चर्चा केली. ज्यानंतर बैठकीत ठरलेल्या बाबींची माहिती मेट्रोकडून एक पत्र लिहून पुणे महापालिकेला देण्यात आलीये. एकीकडे उपमुख्यमंत्री मेट्रोचं काम सुरु करण्याचे आदेश देतात आणि दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचे पदाधिकारी महापालिका सभागृहात गोंधळ घालतात.”
मेट्रोच्या तांत्रिक विभागाकडून दोन पर्याय पुणे महापालिकेला सुचवले आहेत.
१. आता जर पुलाची उंची २१ फूटाहून ३० फूटापर्यंत न्यायची असेल. तर आता बांधकाम झालेले नदीपात्रातील १७ पिलर पाडावे लागतील. त्याला २७ कोटी अतिरिक्त खर्च येईल. हे काम पुन्हा व्हायला त्या वेळेपासून पुढे दिड वर्षाचा कालावधी लागेल.
२. जर या पुलाची उंची ४० फूट वाढवायची असेल, तर नदीपात्रातील एकुण ३८ पिलर पाडावे लागतील. ७९ कोटी त्यासाठी खर्च येईल. अधिकचे दोन वर्ष मेट्रोचं काम करायला लागतील.
मात्र, पुणे महापालिकेनं त्यानंतर मेट्रो अधिकारी आणि गणेश मंडळ यांच्याशी या पर्यायांवर चर्चा केली. हे पर्याय खर्च आणि वेळ यांबाबतील सुयोग्य नव्हते. त्यामुळे महापौरांनी मेट्रोच्या कामाला हरकत नसल्याचं स्पष्ट केलं.

