पुणे : वंचित विकास संस्थेच्या वतीने स्वर्गीय विलास चाफेकर यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त एकदिवसीय सामाजिक परिषदेचे आयोजन केले आहे. विविध क्षेत्रात सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांना आमंत्रित करून विचारांची व अनुभवांची देवाणघेवाण व्हावी, हा या सामाजिक परिषदेच्या आयोजनामागे उद्देश आहे. ही सामाजिक परिषद रविवार, दि. २४ जुलै २०२२ रोजी सकाळी १० ते ४ या वेळेत कर्वे रस्त्यावरील अश्वमेध सभागृहात होणार आहे, अशी माहिती वंचित विकास संस्थेचे कार्यकारिणी सदस्य डॉ. श्रीकांत गबाले, देवयानी गोंगले व मीनाक्षी नवले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
डॉ. श्रीकांत गबाले म्हणाले, “या सामाजिक परिषदेची सांगता चाफेकर सरांच्या आठवणी सांगणारे ‘प्रिय सर’, सामाजिक कार्यासाठी मार्गदर्शक अशा पाच पुस्तिकांचा संच ‘पाया समाजकार्याचा’ आणि बलात्कारासारख्या नाजूक व ज्वलंत विषयावर सरांनी लिहिलेल्या ‘बलात्कार : एक समस्या’ या तीन पुस्तकांच्या प्रकाशनाने होणार आहे. प्रकाशन सोहळा सायंकाळी ५ वाजता ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या रेणू दांडेकर, प्रतिभा गुंडी व आनंद सराफ यांच्या हस्ते होणार आहे.”
मीनाक्षी नवले म्हणाल्या, “सामाजिक कार्य आणि कायदा यावर ॲड. शिवराज कदम जहागीरदार, ट्रायबल मेन्सा नर्चरिंग प्रोग्रामवर डॉ. नारायण देसाई, सजग नागरिक मंचाविषयी विवेक वेलणकर, फॅमिली प्लॅनिंग ऑफ इंडियाविषयी ॲड. अवलोकिता माने, जीवित नदी विषयी शैलेजा देशपांडे, बालरंजन केंद्र मुलांच्या अधिकाराविषयी माधुरी सहस्रबुद्धे, सामाजिक संस्था आणि फंडिंग एजन्सी यांच्यातील संवाद यावर मंजुषा दोषी, संस्कार संजीवनी फाउंडेशनविषयी परमेश्वर काळे, परिवर्तन बहुद्देशीय सेवाभावी संस्थेविषयी धनराज बिराजदार, इन्स्टिट्यूट ऑफ स्टडी ऍब्रॉड विषयी उत्तरा जाधव आणि शासन व सामाजिक संस्था यावर वैशाली नवले या सामाजिक परिषदेत आपले विचार मांडणार आहेत.”
देवयानी गोंगले म्हणाल्या, “सामाजिक कार्यात भरीव योगदान देत असलेल्या संस्था व व्यक्ती या परिषदेत सहभागी होत असून, सामाजिक कार्याविषयी विचारमंथन होणार आहे. ही परिषद सर्वांसाठी विनामूल्य असून, सहभागासाठी नोंदणी आवश्यक आहे. https://forms.gle/V8ErTk6AppNWSRkv7 या लिंकवर नोंदणी करता येणार आहे. अधिक माहितीसाठी मीनाक्षी नवले (७०३०८३३८००) किंवा डॉ. श्रीकांत गबाले (९९२३५५८५३९) यावर संपर्क साधावा.”
विलास चाफेकर यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त वंचित विकासतर्फे रविवारी (दि.२४) सामाजिक परिषद
Date:

