पुणे: महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कारण, जिल्हा न्यायालयाने पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल कऱण्याचे आदेश दिले आहेत.
शहरातील सार्वजनिक शौचालय, अतिक्रमणावर केलेल्या कारवाई दरम्यान झालेल्या वादानंतर न्यायालयाने हे आदेश दिले आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल करुन एक महिन्यांत अहवाल द्यावा असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
काही दिवसांपूर्वी कोथरूड परिसरातील सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम तोडण्याचे निर्देश प्रशासनाने दिले होते. या कारवाईवरुन मोठा वाद झाला होता. परिसरातील नागरिकांनी जागा सोडून जावे यासाठी महापौर मुरलीधर मोहोळ यांनीच ही कारवाई केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. त्यानंतर एका व्यक्तीने न्यायालयात याचिका दाखल केले होती. यावर जिल्हा न्यायालयाने सुनावणी करताना पोलिसांना गुन्हा नोंद करुन तपास करण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी महापौर मुरलीधर मोहोळ यांना विचारले असता त्यांनी म्हटले, या प्रकरणात आपण सविस्तर माहिती घेऊन आपली बाजू लवकरच मांडणार आहोत.

