मुंबई- पार्थिव ब्रीच कँडी रुग्णालयातून प्रभूकुंज या त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहे. येथे काही काळ त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले जाईल. दीदींच्या घराबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,अमिताभ बच्चन हे देखील प्रभूकुंजवर हजर आहेत. सचिन तेंडुलकर, आशा पारेख, सुरेश वाडकर, जावेद अख्तर, अनुपम खेर यांसह अनेक मान्यवर दीदींच्या अंत्यदर्शनासाठी प्रभूकुंज येथे उपस्थित आहेत. दीदींचे निवासस्थान असलेला पेडर रोड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.गानसाम्राझी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनाचे वृत्त ऐकताच राज्यपाल भगत सिंग कोश्यारी तातडीने मुंबईला रवाना झाले. आपल्या नियोजित दुपारच्या वेळेत बदल करत पावणे बारा वाजता त्यांनी मुंबईकडे प्रयाण केले.राज्यपाल गेल्या 4 फेब्रुवारीपासून राज्याच्या दौऱ्यावर होते. आज 6 फेबुवारीला नियोजित 3 वाजता ते मुंबईला प्रयाण करणार होते. तथापि, लतादीदींच्या निधनाची दु:खद बातमी ऐकल्यानंतर त्यांनी आपल्या दौऱ्यामध्ये बदल करत पावणे बारा वाजता मुंबईकडे प्रयाण केले.
अपडेट्स
- स्वरकोकिळा यांच्या निधनाची बातमी मिळताच पंतप्रधान मोदींनी गोव्यातील त्यांची व्हर्च्युअल रॅली रद्द केली आहे.
- भाजपने उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध करण्याचा कार्यक्रम पुढे ढकलला आहे.
- महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर पोहोचून अंत्यसंस्काराच्या व्यवस्थेचा आढावा घेतला.
- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर लताजींच्या अंत्यदर्शनासाठी ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये पोहोचले.
संध्याकाळी साडे सहा वाजता शासकीय इतमामात शिवाजी पार्कवर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. विद्युत दाहिनीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील. लता दीदींना अखेरचा निरोप देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. दुपारी 4.30 वाजता ते मुंबईत दाखल होणार आहेत.
त्यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. नितीन गडकरी यांच्यासह अनेक मान्यवरांनी रुग्णालयात
जाऊन त्यांचे अंत्यंदर्शन घेतले आहे.
स्वर युगाचा अंत झाला मातृतुल्य आशीर्वाद हरपला– मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
लता दिदींच्या जाण्यानं एका स्वर युगाचा अंत झाला, एक महान पर्व संपले. आमच्यावरचा मातृतुल्य आशीर्वाद हरपला अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. स्वरसम्राज्ञी लतादिदी आज आपल्यातून देहाने नाहीशा झाल्या. हे अत्यंत दुःखद आहे. पण त्या त्यांच्या अमृत स्वरांनी अजरामर आहेत, विश्व व्यापून राहिल्या आहेत. त्या अर्थाने त्या आपल्यातच राहतील. अनादि आनंदघन म्हणून त्या स्वर अंबरातून आपल्यावर स्वरअमृत शिंपीत राहतील, अशा शोकमग्न भावनांसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात की, आपल्या लाडक्या लतादिदी आज आपल्यात नाहीयेत, हे सून्न करणारं आहे. पण त्या स्वरांनी, सुरेल गाण्यांनी, चिरपरिचित आवाजाने त्या अजरामर आहेत आणि राहतील. आपल्या आयुष्यातील जवळपास सर्वच प्रसंग,क्षण लतादिदींनी आपल्या सुमधुर सुरावटींनी जिवंत केले आहेत. त्यांच्या स्वरांनी मंगल क्षण सजले. दुःखद क्षणी याच स्वरांनी सगळ्यांच्या मनाचा ठाव घेतला. लढाई, संघर्षात याच स्वरांनी उर्मी,स्फुर्ती जागवली. जगाचा क्वचितच एखादा कोपरा असेल,जिथे त्यांचा स्वर पोचला नसेल, ऐकला गेला नसेल. भाषा, सीमा-प्रांत, वंश-धर्म असे अनेक बंध तोडून त्यांच्या स्वरांचाच एक प्रदेश, भवताल निर्माण झाला आहे.
ठाकरे आणि मंगेशकर कुटुंबियांचे जुने स्नेहबंध आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचे लतादीदी, हृदयनाथ, आशाताई यांच्यासह सर्वांशीच जिव्हाळ्याचे नाते राहिले आहे. त्या निष्णात छायाचित्रकार होत्या. उत्तम कॅमेरे, वेगवेगळ्या लेन्सेस यांचा त्यांचा अभ्यास होता. त्यांच्याशी मध्यंतरी कधीमधी फोटोग्राफी, कॅमेरे याबाबत चर्चा व्हायची. माझ्या दोन्ही छायाचित्र संग्रहांविषयी त्यांनी आवर्जून दाद दिली होती. काही निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी, काही कारणांनी चौकशी करण्यासाठी, त्यांचा फोन येत असे. मध्यंतरी मी रुग्णालयात असतांना त्या सातत्याने माझी विचारपूस करून आशीर्वाद देत असत. त्यांचा तो आपुलकीचा सुमधुर स्वर आता पुन्हा कानी पडणार नाही. त्यांचा तो स्वर हे आमच्यासाठी परमसौख्य होते. हे सौख्य नियतीने हिरावून घेतले आहे. ही त्यांची उणीव जाणवत राहील.
लतादिदींचे जाणे केवळ मंगेशकर कुटुंबियांवरच नव्हे तर त्यांच्या करोडो रसिक चाहत्यांवर आघात आहे. कुणी कुणाचं सांत्वन करायचं?
संगीताचा भावस्पर्शी स्वर हरपला – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील
आपले स्वरमाधुर्य आणि गानप्रतिभेने संपूर्ण विश्वाला मंत्रमुग्ध करणाऱ्या स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे निधन अत्यंत वेदनानदायी आहे. भारतीय संगीताचा भावस्पर्शी स्वर आज हरपला आहे.अशा शब्दात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शोक व्यक्त केला आहे.
लतादीदींच्या तजेलदार, भावमयी आवाजाच्या आनंदघनामध्ये रसिकांच्या पिढ्यानपिढ्या सुरात न्हाऊन निघाल्या आणि यापुढेही हा सूर भारतीय संगीतात अढळ राहील. गानसरस्वती लतादीदींना भावपूर्ण श्रद्धांजली.
नितीन गडकरी – संगीत क्षेत्राची मोठी हानी
आपल्या भावना व्यक्त करताना नितीन गडकरी म्हणाले – लता मंगेशकर या देशाचा अभिमान होता. त्यांनी संपूर्ण विश्वात देशाचे नाव मोठे केले होते. लता मंगेशकर हे जगातील सातवे आश्चर्य आहे, असे म्हटले जाते. त्यांचा आवाज आपण कधीही विसरु शकत नाही. वयाच्या 60 ते 70 व्या वर्षी त्यांचा आवाज हा 20 वर्षांच्या तरुणीप्रमाणे होता. त्यांचे जाणे एक मोठा आघात आहे. आमचा एक मोठा आधार गेला आहे. अनेक भाषांमध्ये त्यांनी गाणी गाऊन विश्वात एक रेकॉर्ड निर्माण केला. माझे त्यांच्या कुटुंबाशी खूप घनिष्ठ नाते होते. त्यांच्या जाण्याने संगीत क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. संपूर्ण देशाला त्यांनी प्रतिष्ठा मिळवून दिली. त्यांच्या जाणे संपूर्ण देशासाठी मोठा आघात आहे. मला खूप दुःख आहे, आजच मुंबईत आलो आणि सकाळीच मी दुःखद बातमी मिळाली. लता दीदींचे जाणे आपल्या सगळ्यांच्या जीवनाला मोठा धक्का आहे.
लतादिदींच्या जाण्यामुळे भारताचे वैभव हरपले… कि. बा. तथा अण्णा हजारे
लतादिदींच्या जाण्यामुळे भारताचे सर्वात मोठे वैभव काळाच्या पडद्याआड गेले आहे. अशी गायिका पुन्हा होईल असे वाटत नाही. गाणारे लोक अनेक आहेत पण लतादिदींसारखा आवाज, गाण्यातील भाव आणि संदेश हे दुर्मिळ आहे. भारतातील सर्व भाषांमधून गाणी गाणाऱ्या त्या एकमेव गायिका असाव्यात. त्यांनी गायिलेली भक्तीगीते, भावगीते व देशभक्तीपर गीते ही सामान्य माणसांना आनंद आणि प्रेरणा देणारी होती. वेगवेगळ्या क्षेत्रात कष्ट करणाऱ्या श्रमिकांनी थकल्यानंतर लतादिदींचे गाणे ऐकले किंवा त्यांचा आवाज कानावर पडला की, क्षणात श्रमपरिहार होत असे.
लतादिदींचा आणि माझा अनेक वेळा भेटण्याचा प्रसंग आला. त्यांच्या हस्ते मिळालेला जीवन गौरव पुरस्कार हा जीवनातील सर्वाधिक आनंदाचा क्षण होता. पद्मश्री व पद्मभूषण पुरस्कार मिळाला तेव्हाही एवढा आनंद झाला नसेल. त्यांनी गायिलेले ‘ए मेरे वतन के लोगो, जरा आँख में भर लो पानी, जो शहिद हुए हैं उनकी, जरा याद करो कुर्बानी’ हे गीत विसरणे कदापि शक्य नाही. हे गीत ऐकताना पंतप्रधानांच्या आणि उपस्थितांच्याही डोळ्यात पाणी आले होते. आजही ते गीत ऐकताना डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहत नाहीत. हे गाणे ऐकून लाखो लोकांच्या मनात देशभक्तीची प्रेरणा जागृत होते.
भगवतगीतेत श्रीकृष्णाने म्हटल्याप्रमाणे ‘अंतःकाळी जो माझे नामस्मरण करतो त्याचा पवित्र आत्मा मलाच येऊन मिळतो’ याप्रमाणे लतादिदींना चिरशांती मिळालेलीच आहे यात शंका नाही. लतादिदींना भावपूर्ण श्रद्धांजली.
“भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्वरात ईश्वराला जागवण्याची व तान्हुल्यांना निजवण्याची जादू होती”- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी महान पार्श्वगायिका भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
भारतरत्न लता मंगेशकर यांचे निधन ही देशातील प्रत्येक कुटुंबाकरिता दुःखद बातमी आहे. हा दिवस अटळ आहे हे माहिती असून देखील हा दिवस येऊच नये असे वाटत होते.भारतरत्न लता मंगेशकर यांचे संगीत देश, भाषा व काळ यांच्या सीमा उल्लंघून थेट अंतरात्म्याला जागवणारे होते.
आपल्या भावगीतांनी ईश्वराला जागविण्याची, प्रेमगीतांनी तरुणाईला खुलवण्याची, देशभक्तीपर गीतांनी जवानांना स्फुरण देण्याची तर प्रेमळ अंगाई गीतांनी तान्हुल्यांना निजविण्याची अद्भुत जादू त्यांच्या स्वरात होती.अभिजात भारतीय संगीत सुलभ करून लतादीदींनी ते समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत पोहचविले. आपल्या दैवी स्वरांनी त्यांनी असंख्य जनसामान्य, शेतकरी तसेच कष्टकरी लोकांना सकारात्मक जीवन जगण्याची नित्यनवी उमेद, ऊर्जा व उत्साह दिला.लतादीदी या तब्बल आठ दशके भारतीय चित्रपट सृष्टीची ओळख होत्या. चित्रपट व संगीत सृष्टीच्या सुवर्ण काळातील साक्षात हिरकणी होत्या.
भारतरत्न लतादीदी महाराष्ट्राच्या कन्या होत्या याचा संपूर्ण महाराष्ट्राला सार्थ अभिमान आहे. त्या आपल्या जीवनकाळात झाल्या हे आपले सद्भाग्य होते.लता मंगेशकर यांच्या निधनामुळे संगीत विश्वातील देव्हारा रिकामा झाला आहे. त्यांचा दैवी स्वरदीप मात्र मनामनात तेवतच राहील.या दुःखद प्रसंगी संपूर्ण राज्याच्या वतीने लतादीदींना आपली भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो व आपल्या शोकसंवेदना आशाताई, उषाताई, मीनाताई, पं. हृदयनाथ तसेच संपूर्ण मंगेशकर कुटुंबियांना कळवतो.
लतादीदींच्या देशविदेशातील करोडो चाहत्यांना देखील आपल्या शोकसंवेदना कळवतो, असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
भारतीय संगीताचं अपरिमित नुकसान – महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनाने भारतीय संगीताचं अपरिमित नुकसान झाले, या शब्दात जगद्विख्यात पार्श्वगायिका लता मंगेशकर यांना महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.
श्री. थोरात आपल्या शोकसंदेशात म्हणतात, भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना त्यांच्या वडिलांकडून म्हणजेच पंडित दिनानाथ मंगेशकर यांच्याकडून गाण्याचा वारसा मिळाला होता. त्यांनी आजीवन संगीताची साधना केली. लता मंगेशकर यांनी 980 पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली असून, 20 हून अधिक प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये गायन केले आहे. 2001 साली लता मंगेशकर यांना ‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तसेच त्यांना 1989 मध्ये ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ देखील प्रदान करण्यात आला होता. संगीत क्षेत्रात भारताचे नाव वेगळ्या उंचीवर नेण्यात त्यांचा फार मोठा वाटा आहे. संगीत साधनेतून जगभरात त्यांनी निर्माण केलेली कीर्ती त्यांच्या चाहत्यांच्या मनात कायम राहिल. त्यांच्या निधनाने भारतीय संगीत क्षेत्रात पोकळी निर्माण झाली असून संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे.
संगीताचा आवाज लोपला- सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे आज संगीताचे सूर हरपले असून संगीताचा आवाज लोपला आहे, त्यामुळे प्रत्येक चाहता आज नि:शब्द आहे, या शब्दांत सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी लता मंगेशकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
तीन पिढ्यांशी समरस झालेल्या लतादीदी या ईश्वराची देण होत्या, त्या पुन्हा होणे नाही. “मेरी आवाज ही पहचान है”, हे त्यांचे शब्द अजरामर ठरणार आहेत. संगीत क्षेत्राला एका वेगळ्या उंचीवर नेणाऱ्या लतादीदींच्या जाण्याने देशाची मोठी हानी झाली आहे असे सांगून मंत्री अशोक चव्हाण यांनी लतादीदींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
एका सुरेल युगाचा अंत – ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत
स्वरसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या दु:खद निधनामुळे पार्श्वगायन आणि संगीत क्षेत्रातील एका सुरेल युगाचा अंत झाल्याची शोकसंवेदना ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी व्यक्त केली आहे.
लतादीदींनी संगीत क्षेत्रातील आपल्या ७८ वर्षांच्या कारकिर्दीमध्ये एकाहून एक सरस अशी तब्बल २५ हजार अजरामर गाणी गायिली. केवळ मराठी वा हिंदीच नव्हे तर जवळपास सर्वच प्रमुख भारतीय भाषांमध्ये त्यांनी गायन करून कोट्यवधी रसिकांना अलौकिक स्वरानंद दिला!
‘ए मेरे वतन के लोगो..जरा आँख मे भर लो पाणी..हे त्यांचे सुमधूर गाणे ऐकून आजही देशवासियांच्या हृदयात राष्ट्रभक्तीचे स्फुल्लिंग पेटते.
लतादीदींनी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासमोर हे गाणे गायिले असता नेहरूजींच्या डोळ्यात अश्रू तरळले होते. लतादीदींच्या निधनामुळे संगीत क्षेत्राची अपरिमीत हानी झाली असून जगभरातील त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. दिवंगत लतादीदींना माझी विनम्र श्रद्धांजली अर्पण करीत असून आपल्या अजरामर गाण्यांमधून लतादीदी रसिकांच्या हृदयात कायमच राहतील, अशा शब्दात डॉ. नितीन राऊत यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

