पुणे : नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणात प्रस्तावित ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आणि कोडिंग’ शैक्षणिक अभ्यासक्रमात येऊ घातले आहे. या तंत्रज्ञानाचा उपयोग कसा करावा, त्यात संभाव्य अडचणी काय आहेत? यावर मंथन करण्यासाठी बंगलोर येथील फुटोलर्न एज्युकेशन संस्थेतर्फे विनामूल्य चर्चासत्राचे आयोजन केले आहे. मंगळवार, दि. १६ फेब्रुवारी २०२१ रोजी ५.३० ते ८ या वेळेत हॉटेल रामादा प्लाझा, हिंजवडी येथे हे चर्चासत्र होणार आहे, अशी माहिती फुटोलर्न एज्युकेशन संस्थेच्या उपाध्यक्ष सेजल समर-जोधावत यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रसंगी अलार्ड पब्लिक स्कूलच्या संचालिका ज्योत्स्ना मिश्रा, एस. बी. पाटील स्कूलच्या प्राचार्या बिंदू सैनी, मिटकॉन इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्या मोनिका छाब्रा उपस्थित होते.
सेजल समर-जोधावत म्हणाल्या, “या चर्चासत्राला शिक्षण प्रसारक मंडळीचे अध्यक्ष अॅड. एस. के. जैन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर आर्किड स्कूलच्या संस्थापक संचालिका लक्ष्मी कुमार, अलार्ड पब्लिक स्कूलच्या संचालिका ज्योत्स्ना मिश्रा, एसएनबीपी स्कूलच्या प्राचार्या जयश्री वेंकटरमन, एस. बी. पाटील स्कूलच्या प्राचार्या बिंदू सैनी, मिटकॉन इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्या मोनिका छाब्रा या चर्चासत्रात सहभागी होणार आहेत. सेजल समर-जोधावत चर्चासत्राचे संचालन करणार आहेत. या तंत्रज्ञानाविषयीच्या अफवा, जागतिक आणि भारतीय परिस्थितीबद्दल मुख्याध्यापक चर्चा करणार आहेत. या चर्चासत्रामध्ये हे धोरण राबवताना विद्यार्थी व शिक्षकांना येणाऱ्या संभाव्य अडचणी, त्याचा वापर, भविष्यातील त्याचे महत्व अशा अनेक गोष्टींवर चर्चा होणार आहे.”
“सीबीएसई अभ्यासक्रम आणि शाळा यांच्यातील दरी भरून काढण्यासाठी फुटोलर्न काम करत आहे. ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आणि कोडिंग’चे उत्तम मोड्यूल शाळांना पुरविणार आहे. भविष्यात कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाला अतिशय महत्व असून, त्याचे विद्यार्थ्यांना उत्तम ज्ञान घेता यावे, यासाठी प्रयोगशाळा व प्रणाली पुरविण्यासाठी शिक्षण क्षेत्रात २० पेक्षा अधिक वर्षांचा अनुभव असलेल्या फुटोलर्नने पुढाकार घेतला आहे. ‘सीबीएसई’ने अनिवार्य विषयांसोबतच कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयाची जोड देण्याचे महत्वाचे पाऊल उचलले आहे. या उपक्रमाला फुटोलर्न साकार करणार आहे,” असेही सेजल समर-जोधावत यांनी नमूद केले.
“मुलांना लहान वयातच कृत्रिम बुद्धिमत्ता या उदयोन्मुख तंत्रज्ञानाची ओळख व्हावी, यासाठी नवीन शिक्षण धोरणात याचा अंतर्भाव करण्यात आला आहे. संज्ञानात्मक कौशल्ये, संघ निर्माण कौशल्य, विचार क्षमता आदीवर भर दिला जाणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि कोडींगची ओळख राष्ट्रीय पातळीवर आणण्यात सरकारने पुढाकार घेतला आहे. ‘सीबीएससी’ने यावरील अभ्यासक्रम जाहीर केला आहे. सोबतच आयसीएससी, आयबी, आयजीसीएसई, एसएससी बोर्ड यांनाही हे धोरण लागू आहे. येत्या काळात शेती, औषधे, शिक्षण इ. प्रत्येक क्षेत्रात कृत्रिम बुध्दीमत्तेचा वापर वाढेल. आपण या सर्व तांत्रिक बाबी समजून घेतल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे डिजिटल इंडियाचे स्वप्न लवकरच पूर्णत्वास जाईल,” असे जयश्री व्यंकटरमन यांनी सांगितले.

