सातारा-विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच फलावर घेतल्याचे माण-खटावमध्ये पाहायला मिळाले. आमच्याकडे सर्व संस्था होत्या. मात्र, आम्ही सत्तेचा माज केला नाही. आज जे सुरू ते सर्व गलिच्छ राजकारण सुरू आहे. अधिकाऱ्यांनो कुणाचाही दबावात कुणाला त्रास देऊ नका, आम्ही कधी सत्तेत येऊ कळणार नाही, असा गर्भित इशारा अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे.
सातारा जिल्ह्यातील मार्डीमध्ये माजी आमदार स्वार्गीय सदाशिवराव पोळ यांच्या स्मरणार्थ आयोजित शेतकरी मेळाव्या प्रसंगी अजित पवार बोलत होते.
विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, राज्यातील 50 जणाचे सरकार विकासकामाचा आराखडा बनवत नाही. केवळ अधिकार्यांच्या बदल्या करण्यात जास्त दंग झाले आहे. केवळ आपल्या मर्जीतले अधिकारी आपल्या मतदारसंघात आणायचे यासाठीच सर्व जण आग्रही आहेत, पण विनाकारण कोणाला त्रास देऊ नका. नाहीतर गाठ माझ्याशी आहे, असा इशारा माजी उपमुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिला.
विकास कामाकडे कुणाचे लक्ष नाही. माण-खटाव मतदारसंघात तात्यांच्या जाण्यानंतर मोठ्या प्रमाणात गलिच्छ राजकारण सुरू आहे. काही लोक अपक्ष निवडून येतात तर काँग्रेसमध्ये जातात तर काँग्रेसमधून निवडून येत भाजपमध्ये जातात आता हे कुठे जाणार असा मिश्किल टोला आमदार जयकुमार गोरेंना लगावला आहे.

