पुणे-
पुणे : महापालिकांच्या निवडणुका अगदी काही महिन्यांवरून येऊन ठेपल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात विकास कामांवरून होणाऱ्या आरोप – प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. आता महापालिकेतील विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने ”विकासाची पोलखोल स्पर्धा” आयोजित करत सत्ताधारी भाजपच्या विकासाचे पोलखोल पुणेकरांमार्फत करण्याचा निर्धार केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून ‘विकासाची पोलखोल’ या स्पर्धा जाहीर केली आहे. शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी या स्पर्धेची घोषणा केली आहे. यामध्ये पुण्यातील नागरिकांनी व्हिडिओ आणि सेल्फी फोटो पोस्ट करणार्या विजेत्या स्पर्धकास बक्षीसं देखील दिली जाणार आहेत. आपल्या भागातील समस्येचा फोटो किंवा व्हिडिओ संबधित व्यक्तीने #polkholpune या हॅशटॅगवर पोस्ट करायचा आहे. या स्पर्धेत विजेत्यांना प्रत्येकी ११,१११ रुपये असे बक्षीस दिले जाणार आहे.
या संदर्भात प्रशांत जगताप म्हणाले,’गेल्या साडेचार वर्षात पुणे शहराच्या झालेल्या दुरावस्थेला सर्व सामान्य पुणेकर वैतागलेले आहेत, त्यांच्या मनातील हा रोष पुणेकर येत्या महापालिका निवडणुकीत मतपेटीतून दाखवनार आहेतच. शहरात खड्डे, उखडलेले ड्रेनेज यांचा त्रास पुणेकर सहन करत असतांनाच भाजपने चकाचक रस्त्यांची फसवी जाहिरातबाजी करणारे होर्डिंग्ज शहरभर लावल्याने आता पुणे शहराची खरी अवस्था सर्वांसमोर आणण्याची गरज आहे. या हेतूनेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे विकासाची पोलखोल स्पर्धा आयोजित करण्यात आली असून यात सर्वसामान्य पुणेकरांनी उखडले रस्ते, रस्त्यांवरील खड्डे या समस्येसोबतचे सेल्फी किंवा शॉर्ट व्हिडीओ सोशल मीडियावर #Polkholpune या हॅशटॅग सह पोस्ट करावयाचे आहेत. यापैकी उत्कृष्ट सेल्फी व व्हिडीओ ला पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे प्रत्येकी ११,१११/- रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त पुणेकरांनी या स्पर्धेत सहभागी होत भाजपच्या फसव्या विकासाची पोलखोल करावी असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहराध्यक्ष श्री.प्रशांत जगताप यांनी समस्त पुणेकरांना केले आहे.

