पुणे – आजपर्यंत अनेक वर्षांच्या संशोधनातून तयार केलेल्या मॉडेल्सवरून मान्सूनचा अंदाज देणारे हवामान खाते यंदाच्या वर्षीपासून उन्हाळ्याचीही पूर्वसूचना देणार आहे. त्यात उष्णता लाट येणार का, कधी येईल व त्याचा फटका कोणत्या भागांना बसेल याचा अंदाज दिला जाणार आहे. देशात ऊन्हाळ्यासंबंधातले पूर्वअंदाज प्रथमच दिले जाणार आहेत.
पुणे वेधशाळेचे उपमहासंचालक डॉ.डी.एस पै या संदर्भात माहिती देताना म्हणाले की मार्च ते जून या काळात किती उष्णतामान असेल, कोणत्या ठिकाणी तीव्र उन्हाळा असेल याचे अंदाज उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच दिले जाणार आहेत. त्याचबरोबर अवकाळी पावसाचेी शक्यता असल्यास त्याचीही पूर्वसूचना देता येणार आहे. सुरवातीला एप्रिल, मे जून या महिन्यांवर लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. गेले काही महिने त्यासाठीची पूर्वतयारी सुरू आहे व उन्हाळ्यासंदर्भातला पहिला अंदाज मार्चमध्येच जाहीर केला जाणार आहे. हे अंदाज देशपातळी व प्रादेशिक स्तरावरही दिले जाणार आहेत.

