बेकायदेशीर निवडणुकाविरुद्ध आंदोलनाची तीव्रता वाढविणार
पुणे : माजी रणजीपटू अनिल वाल्हेकर यांनी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) बेकायदेशीर निवडणुकांविरुद्ध मागील सात दिवसांपासून आमरण उपोषण केले. त्यांना राज्यभरातून मोठा पाठिंबा मिळाला. त्यांना मिळणारा पाठिंबा लक्षात घेता आता हे उपोषण साखळी पद्धतीने सुरू होणार आहे. अनेकांनी ‘एमसीए’ विरोधातील आंदोलनात उडी घेतली आहे. पुणे मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन विजय प्रकाश ढेरे यांनी साखळी उपोषणाची सुरुवात केली आहे.
अनिल वाल्हेकर म्हणाले, ‘महाराष्ट्र क्रिकेट संघटनेची कार्यकारिणी चुकीची आहे. बीसीसीआयच्या सर्वोच्च न्यायालय नियुक्त समितीने त्यांची २०१९ ते २०२२ या कालावधीसाठी झालेली निवडणूक रद्दबातल ठरवली आहे. यानंतर महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे पदाधिकारी ‘चेंज रिपोर्ट’ बदलून निवडणूक घटनेनुसार असल्याचा सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत आहेत.’ या विरोध वाल्हेकर हे मागील सात दिवसांपासून आमरण उपोषण करीत होते. त्यांना माजी रणजीपटू सुभाष रांजणे, मिलिंद गुंजाळ, महाराष्ट्राचे माजी कर्णधार शंतनु सुगवेकर, रॅन्डाॅल्फ डॅनियल, राहुल कानडे, प्रसाद कानडे, रणजित खिरिड, श्रीकांत काटे, युवराज कदम, पूना क्लबचे पदाधिकारी अभिषेक बोके, नितीन कोकाटे, स्टेडियम क्लबचे संस्थापक भारत मारवाडी, आनंद केदारी यांच्यासह राज्यभरातील आजी-माजी खेळाडूंनी पाठिंबा दर्शविला आहे. त्याचबरोबर अनेक पालक, क्रिकेटप्रेमी त्यांच्या भेटीला आले.
त्याचसोबत अनेकांनी महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या संघ निवडीत कसा दुजाभाव केला जातो, हेदेखील निदर्शनासह आणून दिले. धनकवडीतील अश्विनीकुमार जोशी यांनी प्रसिद्धी माध्यमांना पत्र लिहून संघनिवडीबाबत आक्षेप नोंदविला आहे. जोशी म्हणाले, ‘एमसीएकडून महाराष्ट्रातील प्रतिभावान क्रिकेटपटूंवर अन्याय होत आहे. आता आगामी विजय मर्चंट, रणजी करंडक, २५ वर्षांखालील स्पर्धांसाठी तरी एमसीएकडून सदोष संघ निवड होईल, का मुद्दा आहे. निवडणुकीच्या गैरकारभाराबाबत वाल्हेकर यांनी उभारलेल्या लढ्याला माझा पाठिंबा आहे.

