सिंधुदुर्ग-नितेश राणेंच्या अटकपुर्व जामीन अर्जावर सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात सुनावणी सुरू असून, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पोलिसांनी एक नोटीस बजावली आहे. त्यात नारायण राणेंना दुपारी तीन वाजता पोलिस स्टेशनमध्ये हजर राहण्यास सांगितले आहे. नितेश राणेंचा गेल्या तीन दिवसांपासून ठावठिकाणा नाही त्यापार्श्वभुमीवर नारायण राणेंना नोटीस बजावण्यात आली आहे.
नारायण राणेंना का नोटीस ?
पत्रकार परिषदेत नारायण राणेंनी नितेश राणे कुठे आहे हे मला माहिती असुन देखील मी सांगणार नाही असे वक्तव्य केले होते. त्यावरुनच पोलिसांनी नारायण राणेंना नोटीस बजावली आहे. नारायण राणेंना हजेरीसाठी दुपारी 3 वाजता वेळ देण्यात आली होती. परंतु, नारायण राणे हजर झाले नाहीत. त्यानंतर पोलिसांनी तीच नोटीस राणेंच्या घरावर चिकटवली. याच्या काही मिनिटांतच राणेंच्या घरातील कर्मचाऱ्याने ती काढून टाकली.
शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील कणकवली येथे झालेल्या हल्ल्याप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे आणि संदेश सावंत यांच्या अटकपूर्व जामीनावर सिंधुदुर्ग जिल्हा आणि सत्र न्यायालयात सुनावणी सुरू आहे. मंगळवारी या प्रकरणाची सुनावणी होणार होती मात्र, प्रदीर्घ कालावधीनंतर सरकारी वकिलांचा युक्तिवाद अपूर्ण राहिल्याने आज या प्रकरणावर सुनावणी होत आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेना उमेदवार सतीश सावंत यांचा प्रचार करणारे शिवसैनिक संतोष परब यांच्यावर 18 डिसेंबर रोजी कणकवली येथे जीवघेणा हल्ला झाला होता. या प्रकरणी कणकवली पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी मुख्य संशयित आरोपीसह पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
न्यायालयात सरकारी वकील प्रदीप घरत युक्तिवाद करत असून, जामीन अर्जावर आज निर्णय येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज न्यायालय काय निकाल देतो याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. कारण गेल्या दोन दिवसांपासून या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकल्यात येत होती. दरम्यान नितेश राणे गेल्या दोन दिवसांपासून फरार असून, पोलिस त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहे.
काय आहे प्रकरण?
18 डिसेंबरला संतोष परब यांच्यावर कणकवलीत हल्ला झाला होता. परब हे जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे निकटवर्तीय असून करंजे गावचे माजी सरपंच आहेत. त्यांच्यावर इनोव्हा कारमधून आलेल्या दोघांनी धारदार चाकूने वार केले होते. या हल्ल्यात परब जखमी झाले होते. या प्रकरणाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकिय शत्रुत्वाची पार्श्वभूमी असल्याच्या संशयावरून पोलिसांनी भाजपच्या गोटात चौकशीची सूत्रे हलवली आहेत. मुख्य संशयित आरोपी सचिन सातपुतेला सिंधुदुर्ग ग्रामीण पोलिसांनी दिल्लीतून अटक करण्यात यश मिळवले आहे.