आर्थिक अडचण दूर करण्यासाठी थकबाकी भरण्याचे महावितरणचे आवाहन
पुणे, दि. १४ मार्च २०२२ : वीजबिलांच्या वाढत्या थकबाकीमुळे आर्थिक अडचणीत असलेल्या महावितरणने वसूलीसाठी नाईलाजाने थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम तीव्र केली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिकसह अकृषक वर्गवारीतील १३ लाख १८ हजार ९०० थकबाकीदारांकडे तब्बल २ हजार ३२ कोटी ६२ लाख रुपयांच्या वीजबिलांची थकबाकी आहे. गेल्या दहा दिवसांमध्ये महावितरणकडून २७ हजार ६१८ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. दरम्यान पुणे, सातारा, सोलापूर, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील महावितरणचे सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्र या महिन्यातील सर्व सार्वजनिक सुट्टींच्या दिवशी देखील कार्यालयीन वेळेत सुरु राहणार आहेत.
वीजनिर्मिती कंपन्यांकडून वीज खरेदी करणारी महावितरण कंपनी सर्वसामान्य वीजग्राहकांप्रमाणे एक ग्राहक आहे. वीजबिलांच्या वसूलीतूनच सर्व प्रकारच्या देणी महावितरणला भागवाव्या लागतात. मात्र वाढत्या थकबाकीमुळे महावितरणची आर्थिक घडी विस्कटली आहे. अतिदुर्गम खेड्यापाड्यांपासून सर्वच क्षेत्रात वीजसेवा देणाऱ्या व जनतेच्या मालकीची वीज कंपनी असलेल्या महावितरणची आर्थिक स्थिती सध्या अतिशय गंभीर आहे. अशा स्थितीत महावितरणचा आर्थिक डोलारा सावरण्यासाठी वीजग्राहकांनी चालू व थकीत वीजबिलांचा ताबडतोब भरणा करावा असे कळकळीचे आवाहन महावितरणकडून आले आहे.
सद्यस्थितीत पश्चिम महाराष्ट्रात घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, पथदिवे, सार्वजनिक पाणीपुरवठा इतर अकृषक वर्गवारीतील १३ लाख १८ हजार ९०० ग्राहकांकडे २०३२ कोटी ६२ लाख रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये (कंसात थकबाकी) पुणे जिल्हा- ७ लाख ११ हजार ६२५ (७७५ कोटी ६६ लाख), सातारा जिल्हा- १ लाख १९ हजार २८५ (२१५ कोटी ४६ लाख), सोलापूर जिल्हा- १ लाख ९० हजार (६१४ कोटी ३९ लाख), सांगली जिल्हा- १ लाख ४४ हजार २६५ (१७५ कोटी ३६ लाख) आणि कोल्हापूर जिल्ह्यात १ लाख ५३ हजार ७२० ग्राहकांकडे २५१ कोटी ७५ लाख रुपयांची थकबाकी आहे.
कृषी ग्राहक वगळता उर्वरित सर्व वर्गवारीमधील ज्या ग्राहकांचा वीजपुरवठा दि. ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत थकबाकीमुळे कायमस्वरुपी खंडित झाला आहे त्यांच्यासाठी ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांनी ‘विलासराव देशमुख अभय योजना’ नुकतीच जाहीर केली आहे. या योजनेनुसार १०० टक्के व्याज व विलंब आकार माफ करण्यात आले आहे. त्यानंतरची मूळ थकबाकी भरण्यास सहा हप्त्यांची सोय उपलब्ध आहे तर एकाच वेळी मूळ थकबाकी भरल्यास उच्चदाब ग्राहकांना ५ टक्के व लघुदाब ग्राहकांना १० टक्के थकबाकीमध्ये अतिरिक्त सवलत देण्यात येत आहे. यासोबतच कृषिपंप वीजग्राहकांसाठी असलेल्या थकबाकीमुक्ती योजनेत येत्या ३१ मार्च २०२२ पर्यंत सुधारित थकबाकीची ५० टक्के रक्कम व चालू वीजबिल भरल्यास उर्वरित संपूर्ण थकबाकी माफ करण्यात येत आहे.
मात्र वारंवार आवाहन करूनही वीजबिल न भरल्यास वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई सुरु करण्यात आली आहे. गेल्या दहा दिवसांत पुणे जिल्ह्यात १८ हजार ४४८, सातारा जिल्हा- २५१७, सोलापूर- १९५८, कोल्हापूर- २८९६ आणि सांगली जिल्ह्यातील १७९९ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. थकबाकीदारांकडे एका महिन्याचे वीजबिल थकीत असले तरी बिलाची रक्कम किती आहे हे न पाहता नियमानुसार वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरु आहे. त्यामुळे थकबाकी तसेच चालू वीजबिलांचा नियमित भरणा करून सहकार्य करावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. घरबसल्या वीजबिल भरण्यासाठी लघुदाब वर्गवारीतील सर्व वीजग्राहकांना www.mahadiscom.in वेबसाईट व मोबाईल अॅपद्वारे ‘ऑनलाईन’ सोय उपलब्ध आहे. लघुदाब वर्गवारीतील औद्योगिक, वाणिज्यिक व घरगुती ग्राहकांचे वीजबिल १० हजार रुपयांपेक्षा अधिक असल्यास त्यांना ‘आरटीजीएस’ किंवा ‘एनईएफटी’द्वारे थेट वीजबिल भरण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.

