पुणे – खडकवासला धरण साखळीत पाणीसाठा पुरेसा असल्याने पाणीकपात नको, अशी सूचना आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कालवा समितीच्या बैठकीत केली.
यंदा पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा आहे. तसेच सध्या कोवीड साथही जोरात आहे त्यामुळे पाण्याची गरज आहे म्हणून कपात नको, असे शिरोळे यांनी सांगितले. तसेच पाऊस कमी असतो त्यावेळेला नियोजन अधिक काटेकोर असावे लागते. परंतु, पुरेसा पाऊस झाला तरीही काटेकोर नियोजन हवेच. कालवा समितीत पाण्याचे एकूण नियोजन केले जाते. परंतु, त्याची व्याप्ती वाढवून बाष्पीभवन कमी करणे, पाण्याच्या फेरवापरासाठी कमी खर्चाचे उपाय शोधणे यावरही विचार व्हायला हवा. अर्थसंकल्प मांडताना प्रत्येक बाबींचा गांभीर्याने विचार केला जातो, तसाच गांभीर्यपूर्ण विचार पाण्याच्या नियोजनाबाबत ही व्हायला हवा. पाणी हा मूलभूत घटक असल्याने यावर वारंवार कामाचा आढावा घ्यावा असं आमदार सिद्धार्थ शिरोळे म्हणाले. यावर मा. उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी दर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी कालवा समितीची बैठक लावण्याचे आश्वासन दिले आहे.

