मुंबई-एका घरालाही धक्का देऊ देणार नाही. वेळ आली तर काय करायचे ते आपल्याला माहितीच आहे. तुमच्या घरांच्या बाजूलाच रेल्वे लाइन आहे. मध्य रेल्वेची वाहतूक तीन तास बंद झाली तर समजा अख्ख्या भारत बंद होतो. हा ट्रॅक बंद झाल्यास मनमाड, भूसावळ, कुडवाडे अडकते, कुंडवाडे बंद झाले की दक्षिणेला जाणाऱ्या गाड्या अडकतात, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी झोपड्यांवर कारवाई झाल्यास टोकाचं पाऊल उचलण्याचा इशारा दिला..मध्य रेल्वेने मुंब्रा, कल्याण, डोंबिवलीसह रेल्वे स्टेशन परिसरातील रेल्वेरुळांशेजारी राहणाऱ्या लोकांना नोटीस देत सात दिवसांच्या आत घरे रिकामे करण्यास सांगितले आहे. यानंतर स्थानिकांसह खासदार आणि आमदारही आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही यावरुन इशारा दिला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी आधीही निवारा हा त्यांचा हक्क असून कोणी हिरावून घेत असेल तर त्यांच्यासमोर मी छातीचा कोट करुन उभा राहीन असं म्हटलं आहे, असे म्हटले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा रेल्वे प्रशासलाना इशारा दिला आहे.आज राष्ट्रवादीचे नेते गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या परिसरातील रहिवाशांची भेट घेतली यावेळी त्यांनी राष्ट्रवादी या रहिवाशांच्या पाठीशी असल्याचे आश्वासन येथील नागरिकांना दिले. रेल्वेच्या या कारवाईबाबत बोलताना मंत्री आव्हाड यांनी जेव्हा सामुदायिक शक्ती रस्त्यावर उतरते तेव्हा निर्णय घ्यावा लागतो ,उद्या जर पाच लाख लोकांनी एकत्रित पणे रस्त्यावर उतरायचे ठरवलं, तर राज्य सरकार आणि केंद्र सरकार समोर अवघड परिस्थिती होईल असा सूचक इशारा दिला.

“रेल्वे ट्रॅकच्या बाजूला राहणाऱ्या लाखो गरिबांना घरे खाली करण्याच्या नोटीस आलेल्या आहेत. केंद्र सरकारने वेळीच निर्णय घ्यावा. नाहीतर १० झोपडपट्टीवासियांनी जर ठरवलं तर पूर्ण भारतातील रेल्वे बंद होऊन जाईल. गरीब लाचार नसतो तर लढाऊ असतो. क्या गरिबोकि जान, जान नहीं होती सेठ,” असा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे.जितेंद्र आव्हाड यांनी याआधी लोकांची पर्यायी व्यवस्था आधी करा मगच घरं खाली करा, अन्यथा आम्ही त्या लोकांसोबत उभे राहू, असा इशारा दिला होता. “कळव्यात जेव्हा असाच निर्णय झाला होता तेव्हा आम्ही तीन तास रेल्वे रोखून धरत सरकारला निर्णय बदलण्यास भाग पाडलं होतं. मी मंत्री नंतर आहे, पहिल्यांदा लोकांचा कार्यकर्ता आहे. आम्ही एकाही माणसाला घराबाहेर प़डू देणार नाही. निवारा त्यांचा हक्क असून कोणी हिरावून घेत असेल तर त्यांच्यासमोर मी छातीचा कोट करुन उभा राहीन. गरिबाला न्याय दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही,” अशा इशाराच जितेंद्र आव्हाड यांनी दिला होता.
दरम्यान, रेल्वेने रुळांलगतच्या झोपडीधारकांना नोटीसा दिल्या नंतर शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी आक्रमक भूमिका घेतली असून जागा घ्यायची तर जीवदेखील घ्या अशा शब्दांत सुनावलं आहे. पुनर्वसनाशिवाय घरांवर कारवाई होऊ देणार नाही असा इशाराही यावेळी त्यांनी दिला आहे. उद्या जर कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली तर त्याला सर्वस्वी रेल्वे प्रशासन जबाबदार असं श्रीकांत शिंदे म्हणाले. डोंबिवली पूर्वेच्या कोपर परिसरासह शेलार नाका, कल्याण पूर्वेतील आनंदवाडी परिसरातील नागरिकांची श्रीकांत शिंदे यांनी भेट घेतली होती.
चल घराच्या बाहेर निघ म्हणायला , अरे तुझ्या बापाचं राज्य आहे का ?
या कारवाईत पाच लाख नागरिक बाधित होणार आहेत आणि पाच लाख नागरिकांना घराच्या बाहेर काढायला तुम्हाला मिलिटरी आणावी लागेल. पोलिसांचे काम नाही ते. हे केवळ घाबरवण्यासाठी केले आहे, असे माझे मत आहे. भाजपचे प्रत्येकवेळी ठरलेले असते लोकांना घाबरवून सोडायचे. आता भाजप प्रचाराला येईल तेव्हा बोलेल तुमची घर वाचवणार, की टाका कमळाला मत. हे असले धंदे मी नाही केले, जेव्हा माझ्याच सरकारने निर्णय घेतला झोपड्या पडायच्या तेव्हा त्याच सरकारचा विरोधात आंदोलन करुन रेल्वे बंद केली आणि न्याय घेतला. रक्त सांडण्याची तयारी ठेवा. हा लढा मागे राहून लढता नाही येणार. मी इथे आलो आहे तर, या लढ्याचं नेतृत्व मी करेल. आपण सगळे मिळून लढूया, हा माझ्या एकट्याचा लढा नसणार. भाषण देऊन चाललो पुन्हा येणार नाही असं वाटायला नको तुम्हाला म्हणून सांगतो. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील मध्यस्ती करावी लागेल. तुम्ही मतदार आहेत तुमच्याकडे रेशन कार्ड आहे, ५० वर्षे वास्तव्याचा दाखला आहे. असे असताना चल घराच्या बाहेर निघ, अरे तुझ्या बापाचं राज्य आहे का ? एवढे वर्ष झोपले होते का, असा प्रश्न आव्हाड यांनी विचारला.

