मुंबई-एमआयएम पक्षाने आघाडीसाठी दिलेली ऑफर हा कट असल्याचा आरोप राज्याचे मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानासाठी उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या सर्व खासदारांना आणि जिल्हाप्रमुखांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी भाजपावर जोरदार टीका केली. बुडाखाली सत्ता हवी असून ही एका घातक हुकूमशाहीची नांदी आहे अशी टीका उद्धव ठाकरेंनी यावेळी केली.“सत्ता आल्यानंतर निखाऱ्यावरील जमलेल्या राखेवर फुंकर मारण्याची गरज आहे. धगधगता निखारा ही शिवसेनेची ओळख असून ती राख झटकून टाकणं, त्याची धग विरोधकांना दाखवण्याची गरज आहे,” असं आव्हान उद्धव ठाकरेंनी यावेळी केलं. एकहाती सत्ता यावर नंतर बोलू…पण पक्ष वाढवण्याची गरज आहे असं उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितलं.औरंगजेबाच्या थडग्यावर डोकं टेकणारी जी औलाद आहे, तिच्यासोबत छत्रपतींचा महाराष्ट्र आणि त्यांचा सैनिक म्हणवणारा शिवसैनिक हा कदापि जाणार नाही आणि मी जाऊ देणार नाही असा पुनरुच्चार उद्धव ठाकरेंनी केला. यावेळी त्यांनी भाजपाचं मुस्लीमप्रेम जनतेसमोर आणण्याचं आवाहनही केलं. शिवसैनिक हिंदुत्वाचा अंगार असतो हे त्या भंगारांना दाखवून द्या असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
येत्या 22 मार्चपासून विदर्भ आणि मराठवाड्यात शिवसेनेचे शिवसंपर्क अभियान सुरू होत आहे. त्यानिमित्त शिवसेनेचे खासदार आणि जिल्हाप्रमुखांना शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेना भवनमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मार्गदर्शन केले. यावेळी गेल्या काही दिवसांपासून आघाडीत सहभागी होण्याबाबत एमआयएमने दिलेल्या प्रस्तावावर उद्धव ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट केली. शिवसेना हिंदुत्ववादी होती आणि राहिल. शिवसेनेच्या हिंदुत्वामध्ये भेसळ नाही. एमआयएम ही भाजपची ‘बी’ टीम आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत युती कदापीही करणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
शिवसेना अंगार आहे, हे दाखवून द्या!
एमआयएमच्या ऑफरमागे व्यापक कट आहे. शिवसेनेला, शिवसेनेच्या हिंदुत्वाला बदनाम करण्याचे हे कारस्थान आहे. यामागे भाजपच असल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच, शिवसेनेच्या भगव्याला बदनाम करणाऱ्यांना नेस्तनाबूत करा. शिवसेना अंगार आहे, भाजप भंगार आहे हे दाखवून द्या, असे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केले. शिवसंपर्क अभियान यशस्वी करुनच या, अशा शुभेच्छा देताना शिवसेनेची ताकद राज्यभर वाढवा, असे आदेश उद्धव ठाकरेंनी जिल्हाप्रमुख व खासदारांना दिले. गेल्या विधानसभा निवडणुकीत जे मतदारसंघ भाजपने जिंकले, त्या ठिकाणी जोरदार तयारी करा. भाजपची जिथे ताकद आहे, तिथे आपली ताकद वाढली पाहिजे, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.
जनतेच्या मनातील संशय दूर करा!
तुमच्याकडून आघाडीची ऑफर द्या, असे एमआयएला भाजपनेच आदेश दिले आहेत. औरंगजेबाच्या कबरीपुढे नतमस्तक होणाऱ्यांचा संबंध शिवसेनेशी नव्हे, तर भाजपचाच अशा लोकांशी संबंध आहे. त्यामुळे शिवसंपर्क अभियानात लोकांच्या मनातील सर्व संशय दुर करा, शिवसेनेला बदनाम करण्याचा हा व्यापक कट उधळून लावा, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. यासोबतच जनतेच्या समस्या, अडचणी समजून घ्या. त्या दुर करण्याचा प्रयत्न करा, असे आदेशही त्यांनी दिले.
राज्यपालांची भूमिका लोकशाहीविरोधी!
राज्यपाल नियुक्त आमदारांची नेमणुक अद्याप रखडल्यावरुन मुख्यमंत्र्यांनी राज्यपाल व भाजपवर टीका केली. 12 आमदारांची नियुक्ती प्रलंबित ठेवून राज्यपाल राज्यातील नागरिकांचेच हक्क डावलत आहेत. त्यांची ही भूमिका लोकशाहीविरोधी आहे. मात्र, भाजप त्यावर काहीही बोलायला तयार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
जनाब कौन आहेत, हे आम्ही सांगू – संजय राऊत
दरम्यान, शिवसेना आता बाळासाहेब ठाकरे यांनाही जनाब बाळासाहेब ठाकरे म्हण्ण्यास मागेपुढे पाहणार नाही, अशी बोचरी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर संजय राऊत यांनी त्याला उत्तर दिले आहे. ते म्हणाले, जम्मू-काश्मिरमध्ये दहशतवाद्यांशी हातमिळवणी करुन सत्ता स्थापन करून भाजपने दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या जवानांचा अपमान केला आहे. मेहबुबा मुफ्ती यांच्यासोबत सरकार स्थापन करताना त्यांना काही वाटले नाही. त्यामुळे त्यांनी आम्हाला अक्कल शिकवू नये. जनाब कौन आहेत, हे वेळ आल्यावर आम्ही तुम्हाला सांगू.

