निखळ आनंदाचा ‘व्‍यंग कॉर्नर’

Date:

व्‍यंगचित्र म्‍हणजे नेमकं काय असा प्रश्‍न अनेकांना पडू शकतो. ‘हसवता-हसवता वाचकाला विचार करायला भाग पाडणे’ हे व्‍यंगचित्राचं महत्‍त्वाचं काम असंही काहींना वाटतं. पण व्‍यंगचित्रांच्‍या अनेक लिखीत-अलिखीत बाबींपैकी ही एक महत्‍त्‍वाची बाब म्‍हणता येईल.   व्‍यंगचित्रकार हे वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असल्‍याने त्‍यांच्‍या व्‍यंगचित्रांवर त्‍या-त्‍या क्षेत्राचा प्रभाव पडू शकतो. व्‍यंगचित्रकार भरत सावंत मात्र याला अपवाद ठरतात. भारतीय सैन्‍य दलातून निवृत्‍त झालेले सावंत आपल्‍या व्‍यंगचित्रांतून सामाजिक प्रबोधनावर भर देतांना आढळून येतात. त्‍यांचे ‘व्‍यंगकॉर्नर’ हे पुस्‍तक प्रकाशित झालं आहे. यामध्‍ये सव्‍वाशेहून अधिक व्‍यंगचित्रे आहेत. त्‍यांची सैन्‍यदलाची पार्श्‍वभूमी पहाता, या पुस्‍तकात सैन्‍यदलातील शिस्‍त, वक्‍तशीरपणा, धाक, नागरी जीवनाशी जुळवून घेतांना येणाऱ्या अडचणी  यावर आधारित व्‍यंगचित्रे पहावयास मिळतील अशी अपेक्षा होती. ती भविष्‍यकाळात पूर्ण होईल,अशी आशा करुया.

                पुस्‍तकाच्‍या मुखपृष्‍ठावर फेसबुक, व्‍हॉट्सअप आणि ट्वीटर यांना मानवी रुपांत दाखवण्‍यात आले आहे. या ‘थ्री इडियट्स’नी ‘आमचा वापर चांगला केला तर ठीक… अन्‍यथा आम्‍ही थ्री इडियट्स’ असा इशारा दिला आहे. सोशल मिडीया हे दुधारी शस्‍त्र असून त्‍याचा विवेकपूर्ण वापर करण्‍याचा सल्‍ला व्‍यंगचित्रकार भरत सावंत देतात. ‘व्‍यंगकॉर्नर’ या पुस्‍तकात सद्यस्थितीवर मार्मिक टीका करणारी विविध व्‍यंगचित्रे आहेत. हेल्‍मेट जनजागृती, पेट्रोल दरवाढ, जीएसटी, शाळांचे डोनेशन, दप्‍तराचे ओझे, भिकारी, व्‍यसनाधिनता, रस्‍त्‍यावरील खड्डे, वाहतूक कोंडी, पाळणाघर, वृध्‍दाश्रम, राजकारण या विषयांचाही त्‍यात समावेश आहे. निवडणूक मतदान जनजागृतीवरही प्रबोधनपर व्‍यंगचित्रमाला आहे. याशिवाय हिंदी चित्रपट गीतांवरील व्‍यंगचित्रमालाही वाचकांना आवडेल, अशीच आहे.

                भरत सावंत यांना महाविद्यालयात असतांनाच व्‍यंगचित्रांचा छंद जडला. अनेक व्‍यंगचित्रकारांचे प्रेरणास्‍थान असणारे श्रेष्‍ठ व्‍यंगचित्रकार  बाळासाहेब ठाकरे हे त्‍यांचेही आदर्श. ‘कुंचला आणि पलिते’ या व्‍यंगचित्र पुस्‍तकाचाही त्‍यांच्‍यावर खूप प्रभाव पडला. या पुस्‍तकात श्रेष्‍ठ व्‍यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे आणि त्‍यांचे बंधू श्रीकांत ठाकरे यांच्‍या व्‍यंगचित्रांचा समावेश आहे. याशिवाय ‘मार्मिक’मधून अनेक व्‍यंगचित्रकारांची व्‍यंगचित्रे पाहून या कलेविषयी आकर्षण निर्माण झाले. ठाण्‍याच्‍या ज्ञानसाधना कॉलेजमधून बारावी पास झाल्‍यावर सावंतांनी जे.जे. स्‍कूल ऑफ आर्टसमध्‍ये जाऊन व्‍यंगचित्रकलेबाबत विचारणा केली. परंतु, तेथे असा काही अभ्‍यासक्रम नसल्‍यानं त्‍यांची निराशा झाली. पण ते नाउमेद झाले नाही. त्‍यानंतर त्‍यांनी व्‍यंगचित्रकारद्वय विवेक मेहेत्रे आणि सुरेश क्षीरसागर यांच्‍याकडून व्‍यंगचित्रकलेचं प्रशिक्षण घेतले. ‘मार्मिक’मध्‍ये 1992 मध्‍ये त्‍यांचे पहिले व्‍यंगचित्र प्रसिध्‍द झाले. त्‍यानंतर सामना, पुढारी, रामप्रहर आणि इतर दैनिकांसह दिवाळी अंकांत प्रसिध्‍द झाले. व्‍यंगचित्रकारिता आणि पत्रकारिता सुरु असतांनाच ते 1994 मध्‍ये भारतीय सैन्‍यात भरती झाले. सैन्‍यात असतांनाही त्‍यांनी आपली कला जोपासली. बंदूक, लेखणी आणि कुंचला या तिन्‍हींवर त्‍यांनी हुकूमत गाजवली. व्‍यंगचित्रे ही निख्‍खळ आनंद व मनोरंजनात्‍मक दृष्टिकोनातून रेखाटलेली असल्‍याचे त्‍यांनी मनोगतातच स्‍पष्‍ट केलं आहे. व्‍यंगचित्रे ही हसता-हसता किंवा नर्मविनोदीपणे व्‍यंगात्‍मक सत्‍य सांगून जात असतात आणि हीच रेषा पकडून ही व्‍यंगचित्रे रेखाटण्‍यात आलेली आहेत. त्‍यांच्‍या वाटचालीत पत्‍नी सौ. आशा भरत सावंत आणि मुलगा यश यांचे खूपच सहकार्य लाभल्‍याचं नमूद करतात. ‘दैनिक सामना’च्‍या ‘मी पाहिलेले बाळासाहेब’ या ऑनलाईन ब्‍लॉग स्‍पर्धेत ‘व्‍यंगचित्रकारांचे भीष्‍म पितामह बाळासाहेब’ या सावंत यांनी लिहीलेल्‍या ब्‍लॉगचा दुसरा क्रमांक आला. त्‍याबद्दलही त्‍यांना सन्‍मानित करण्‍यात आलं.

                ‘व्‍यंगकॉर्नर’ या पुस्‍तकात शिक्षणपध्‍दतीवर टीका करणारे बेरोजगार जसे भेटतात तसेच पेट्रोलपंपावर काळ्या पाईपाऐवजी पारदर्शक पाईप बसवण्‍याचा आग्रह धरणारा ‘जागरुक ग्राहक’ही भेटतो. चश्‍मा लावलेला नसतांना दिसणारं कमी वजन आणि चश्‍मा लावल्‍यानंतर दिसणारा वाढलेला आकडा यातील तफावत म्‍हणजे चश्‍म्याचं वजन असा सोयीचा अर्थ काढून मनाचं समाधान करणारी महिलाही नकळतपणे  हसवून जाते. लहानपणी बाळाला पाळणाघरात ठेवणारे मॉम-डॅड आणि भविष्‍यात त्‍यांना वृद्धाश्रमात रहावं लागण्‍याची येणारी वेळ वाचकांनाही आत्‍मपरीक्षण करायला लावते. एकूणच हे पुस्‍तक निखळ मनोरंजन करुन वाचकांना अंतर्मुखही करतं.

व्‍यंगचित्रकार- भरत सावंत

मुखपृष्‍ठ रचना – मनोज्ञा मेहेत्रे

प्रकाशक-उद्वेली बुक्‍स, ठाणे

पृष्‍ठं- 116

किंमत- 200 रुपये

राजेंद्र सरग

9423245456/ 9309854982

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पहिल्या दिवशीच एकानेही भरला नाही उमेदवारी अर्ज

पुणे- एकीकडे विरोधकांची बलस्थाने असलेले ,किंवा निवडून येऊ शकणारे...

5 लाखांची लाच घेताना जीएसटी अधिकाऱ्याला अटक:सीबीआयने ठोकल्या बेड्या, घरात 18 लाखांची रोकड सापडली

मुंबई-मुंबईच्या सीजीएसटी कार्यालयाचे अधीक्षक एका खाजगी कंपनीच्या संचालकाकडून लाचेची...

ठाकरे गटाला आणखी एक धक्का; घाटकोपरमधील डॉ. अर्चना संजय भालेराव यांचा भाजपामध्ये प्रवेश

मुंबई, दिनांक २३ डिसेंबर २०२५ बृह्ममुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीच्या आधी १२६,...