पुणे, ता. २८ – नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीमुळे पाश्चिमात्य विचारवंतांच्या प्रभावाखालील आपले शैक्षणिक धोरण भारतीय संस्कृती आणि परंपराच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी मैलाचा दगड ठरेल असा विश्वास डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळ आणि परिषदेचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे यांनी व्यक्त केला.
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाच्या (बीएमसीसी) भाषा विभागाच्या वतीने ‘नवीन शैक्षणिक धोरण आणि भारतीय भाषा’ या विषयावरील वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. प्राचार्या डॉ. सीमा पुरोहित, डॉ. अशोक थोरात, डॉ. सविता केळकर, डॉ. महेश कुलकर्णी, डॉ. सोनल कुलकर्णी-जोशी, डॉ. अंबा कुलकर्णी यांनी वेबिनारमध्ये सहभाग घेतला.
कुंटे म्हणाले, ‘विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रांबरोबर नवीन शैक्षणिक धोरणात कला, साहित्य, क्रीडा आणि भाषेचा प्रामुख्याने विचार केल्याने देशाचा सर्वांगिण विकास होऊ शकेल, त्यासाठी या प्रत्येक क्षेत्राचा सविस्तर विचार करणे आवश्यक आहे.’
कुंटे पुढे म्हणाले, ‘नव्या धोरणाप्रमाणे प्राथमिक शिक्षण मातृभाषेत देणे आवश्यक आहे. त्यामुळे सध्या अस्तित्वात असलेल्या इंग्रजी किंवा अन्य माध्यमांच्या शाळांना त्याप्रमाणे बदल करावे लागणार आहेत. नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीमुळे भाषांमधील परस्पर संबंध आणि एकात्मता वाढीस लागेल. त्यामुळे देशाच्या सर्वांगिण विकासाबरोबर सांस्कृतिक विकास होऊ शकेल.’
डॉ. पुरोहित यांनी प्रास्ताविक, डॉ. सुनिता निर्मले यांनी सूत्रसंचालन आणि प्रा. विजय दरेकर यांनी आभार प्रदर्शन केले.

