पुणे : कोरोना साथीच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा अनुभव लक्षात घेऊन कोरोना व्हायरस ओमिक्रॉन व्हेरिएंट या नव्याने आढळलेल्या धोकादायक विषाणुबाबत प्रशासनाने सतर्कता बाळगावी, अशी सूचना आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी केली आहे.कोरोनाच्या नव्या विषाणुचा धोका लक्षात घेता शिवाजीनगर येथील जंबो कोविड सेंटरचे इन्फ्रास्ट्रक्चर काढू नये ,असेही शिरोळे यांनी सांगितले.
कोविड-१९च्या अनुषंगाने विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि कार्यवाहीचा आढावा घेण्याकरिता उपमुख्य मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज शनिवारी बैठक झाली. त्यात सहभागी होऊन आमदार शिरोळे यांनी विविध मुद्दे मांडले.कोरोनामुळे ज्या नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अशा नागरिकांच्या कुटुंबियांना ५० हजार रुपये देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मृत व्यक्तिंच्या कुटुंबियांपर्यत पोहोचण्यासाठी मृत व्यक्तिंची यादी शासनाने लोकप्रतिनिधींनाही द्यावी, त्यामुळे मृतांच्या कुटुंबियांपर्यंत पोहोचण्यास शासनास मदत होईल, असे आमदार शिरोळे यांनी सुचविले.पुण्यातील कोरोना कंट्रोल मॉडेलचे डॉक्युमेंटेशन अंतिम टप्प्यात असल्याची माहिती आ. शिरोळे यांनी दिली.
मेट्रो, उड्डाणपूल कामामुळे
वाहतूक कोंडी होऊ देऊ नका
हिंजवडी मेट्रो मार्ग आणि पुणे विद्यापीठ उड्डाणपुलाचे काम पूर्ण होईपर्यत वाहतुकीची कोंडी होणार नाही याची काळजी घेतली जाईल, असे आश्वासन संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिले आहे, अशी माहिती आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी कळविली आहे.
शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रोचे काम सुरू होत असताना त्या मार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी कामाशी संबंधित खात्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलवावी असे पत्र आमदार शिरोळे यांनी दि. १७ नोव्हेंबर २०२१ रोजी पालकमंत्री पवार यांना दिले होते. या पत्राची दखल घेऊन आज शनिवारी पालकमंत्री पवार यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. वाहतूक नियोजन आराखड्याची लवकरात लवकर अंमलबजावणी व्हावी, नियमित बैठका घेऊन अडचणी सोडवल्या जाव्यात अशी सूचना आ. शिरोळे यांनी केली. सर्व खात्याच्या अधिकाऱ्यांनी वाहतूक नियोजन काटेकोरपणे होईल, असे सांगितले.

